नवी दिल्ली : मुंबईच्या विविध भागातील वाढत्या झोपडपट्ट्या ही एक मोठी समस्या बनली असून तिला आळा घालण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना मुंबईत प्रभावीपणे राबवावी, स्वस्त आणि चांगली घरे बांधण्यात आल्यास झोपडपट्ट्याचे वाढते प्रमाण निश्चित कमी होईल, असे मत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत मांडले.
मुंबईतील वाढत्या झोपडपट्ट्या, येथील रहिवाश्यांना मूलभूत सेवा आणि सुविधा देताना येणाऱ्या अडचणी, मुंबईतील गरीब, सर्वसामान्य लोकांच्या हाताबाहेर गेलेल्या घरांच्या किंमती अशा विविध विषयावर लोकसभेत रविंद्र वायकरांनी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १० लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी. तसेच या योजनेअंतर्गत मुंबईत स्वस्त व गुणवत्तापूर्ण घरे बांधण्याची योजना तयार केल्यास, झोपड्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे शक्य होईल. मुंबईतील मध्यमवर्गीय जनतेसाठी परवडणारी घरे, गरीब परिवारांसाठी भाड्याची घरे निर्माण करणे आवश्यक आहे. यामुळे ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे ते घर घेऊ शकतील, असेही वायकरांनी या प्रस्तावात म्हटले आहे.
परवडणाऱ्या आणि भाड्याच्या घरांच्या योजनेमुळे चांगल्या, सुरक्षित घरांचा पर्याय गरीब, मध्यमवर्गीय जनतेला मिळेल, परिणामी झोपड्यांच्या संखेत घट होईल. यामुळे जनतेचे जीवनमान उंचवण्यासही मदत होईल. त्याच बरोबर मुंबईचा विकास संतुलित ठेवणे शक्य होणार आहे, असेही रविंद्र वायकर यांनी मांडलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे.