पुढारी ऑनलाईन डेस्क : कोट्यवधी रुपयांच्या वक्फ मालमत्तेवर कब्जा केलेल्यांकडून वक्फ विधेयकाला विरोध सुरु आहे. हे लोक शक्तिशाली असून, निष्पाप लोकांना दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी 'ANI'शी बोलताना केला. ( Waqf Amendment Bill )
यावेळी रिजिजू म्हणाले की, विधेयकावर टीका करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे; परंतु त्या टीकेला काही अर्थ असला पाहिजे. वक्फ विधेयकाला विरोध करणारे कोण आहेत? काही शक्तिशाली लोक आहेत ज्यांनी वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे. ते निष्पापलोकांची दिशाभूल करत आहेत.
केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिल (केसीबीसी) ने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या आणि राज्य खासदारांनाही असेच करण्याची विनंती करणाऱ्या पत्राबाबत रिजिजू म्हणाले की, धार्मिक आधारावर अनेक संघटना केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या विधेयकाला पाठिंबा देत आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयक गरीब मुस्लिम, मुले आणि महिलांच्या हिताचे आहे यामुळे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत मालमत्तांच्या व्यवस्थापनात जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित होईल, असा विश्वासही रिजिजू यांनी व्यक्त केला.
रिजिजू म्हणाले, "केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिलने पाठवलेले विनंती पत्र सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध समुदायातील अनेक संघटना वक्फ (सुधारणा) विधेयकाला पाठिंबा देत आहेत. आपण हे समजून घेतले पाहिजे की हे विधेयक मुळात गरीब मुस्लिम, मुले आणि महिलांच्या हिताचे आहे आणि वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने केले जाईल याची खात्री करते."
"केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिल आणि इतर अनेक ख्रिश्चन संघटना केरळच्या खासदारांना वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर भूमिका घेण्यास आणि त्याच्या बाजूने मतदान करण्यास सांगत आहेत. कारण केरळमध्ये कोचीनजवळील मुनांबम नावाच्या ठिकाणी, शेकडो गरीब कुटुंबांना वक्फकडून त्यांच्या जमिनी जप्त करण्याचा धोका आहे. जमीन जप्तीच्या धमकीविरुद्ध वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आंदोलनावर प्रकाश टाकताना, केरळच्या खासदारांना "तुष्टीकरणाचे राजकारण" करण्याऐवजी संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्याचे त्यांचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले.