राष्ट्रीय

राजधानीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे!

Pudhari News

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा सत्तारूढ झालेल्या सरकारला दोन वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहेत. पंरतु, आतापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाचा एकदाही विस्तार करण्यात आलेला नाही. कोरोना महारोगराईमुळे विस्ताराचा मुर्हूत टळत असल्याचे बोलले जात आहे. महारोगराईची दुसरी लाट आता ओसरत आहे, अशात पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे. 

पंतप्रधान जून महिन्यातच यासंबंधी मोठा निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विस्तारित मंत्रिमंडळात अनेक प्रमुख पक्षाच्या प्रमुख चेहऱ्यांना समाविष्ठ केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. जनता दल (यू) तसेच अपना दल ला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपने यापक्षाच्या प्रमुखांसोबत चर्चा सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्यस्थितीत मोदींच्या मंत्रिमंडळात २२ पदे रिक्त आहेत. केंद्र सरकारमध्ये २२ कॅबिनेट, ९ स्वतंत्र प्रभार तसेच २९ राज्यमंत्री आहेत. अशाप्रकारे एकूण मंत्र्यांची संख्या ६८ आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह जास्तीत जास्त ८२ मंत्र्यांचा समावेश केला जावू शकतो. अशात मोदी मंत्रिमंडळात २२ मंत्र्यांचे पदे रिक्त आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी यापूर्वीच चर्चा करण्यात आली होती. पंरतु, विस्तारावर कोरोनामुळे ब्रेक लागला होता. 

अनेक मंत्र्यांवरील कामाचे ओझं वाढले आहे. काही मंत्र्यांचे निधन तसेच शिवसेना आणि अकाली दल एनडीएतून बाहेर पडल्यामुळे अनेक पदे रिक्त झाल्याने विद्यमान मंत्र्यांवर कामांचा व्याप वाढला आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरणासह अवजड उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवास यांच्या निधनानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अन्न व नागरी पूरवठा, ग्राहकसंरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे कृषी मंत्रालयासह ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाचा कार्यभा आहे. अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांच्या राजीनाम्यानंतर अन्न प​क्रिया ​मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार तोमर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या अपघातानंतर क्रिडा मंत्री किरण रिजिजू आयुष मंत्रालयाचे काम बघत आहेत. सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रेल्वे राज्य मंत्री पद खाली आहे. अशात ​मंत्रिमंडळाचा विस्तार करून या मंत्र्यांवरील कामाचे ओझं कमी केले जाणार आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रीय मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना देखील केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने राजधानीत राजकीय घडामोडींना वेग मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT