पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्र सरकारने नॅशनल काउंसिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या महासंचालक पुनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती केली आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असणार आहे.
RBI चे माजी उपगव्हर्नर एम. डी. पात्रा यांनी जानेवारीमध्ये राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) पुनम गुप्ता यांच्या RBI उपगव्हर्नर पदाच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून, त्या आपल्या कार्यभार स्वीकारण्याच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी ही जबाबदारी सांभाळतील.
सध्या पुनम गुप्ता या भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक धोरण संशोधन संस्था NCAER च्या महासंचालक आहेत. त्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य आहेत तसेच 16 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार समितीच्या संयोजक (कन्व्हीनर) म्हणूनही कार्यरत आहेत.
NCAER मध्ये प्रवेश करण्यापूर्वी जवळपास दोन दशके त्या वॉशिंग्टन डिसी. येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेत (World Bank) वरिष्ठ पदांवर कार्यरत होत्या.
प्राध्यापक म्हणून काम
दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, मेरीलँड विद्यापीठ (USA) येथे अध्यापन केले असून, भारतीय सांख्यिकी संस्था (ISI), दिल्ली येथेही अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
गुप्ता यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) येथे RBI चेअर प्रोफेसर आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (ICRIER) येथेही प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे.
पूनम गुप्ता यांनी मेरीलँड विद्यापीठ (USA) येथून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. प्राप्त केली असून, दिल्ली विद्यापीठाच्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथूनही अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
दरम्यान, 1998 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील पीएच.डी. संशोधनासाठी EXIM बँक पुरस्कार मिळाला होता.