अखिल भारतीय साहित्‍य संमेलनाच्या समारोपप्रसंगी उपस्‍थित संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, डॉ. पी. डी. पाटील पाटील.  Pudhari Photo
राष्ट्रीय

संमेलनाचे आयोजन करताना राजकीय समतोल साधला : मंत्री उदय सामंत

Marathi Sahitya Sammelan| ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमलेनाचा समाराेप

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली : ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार करून संमेलनाचा समारोप झाला. याप्रसंगी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आपले मनोगत व्यक्‍त केल. यावेळी बोलताना ते म्हणाले की ज्यांनी पुरस्कार दिल्याने संमेलन गाजवले त्यांनाही संमेलनाच्या मंचावर आणले. उत्तम आयोजन केले आणि राजकीय समतोलही साधला. व्यासपीठ तयार करत असताना त्यावर आपण असण्यापेक्षा त्याला ताकद दिली पाहिजे, अशी माझी भावना होती. मावळते संमलेनाध्यक्ष रवींद्र शोभणे मंचावर होते, माझ्या वडिलांचे नाव रवींद्र आहे. ते मला वडिलांसारखे आहेत आणि साहित्यातील बाप आहेत, असेही ते म्हणाले. २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषा अध्यासन केंद्र दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी विशेष प्रयत्न केले आणि संमेलनापाठोपाठ अध्यासनही सुरू होत असल्याचे ते म्हणाले. यंदा रेल्वेत झालेले साहित्य यात्री संमेलन दरवर्षी व्हावे,अशी मागणी सामंत यांनी महामंडळाकडे केली त्यासाठीही राज्य सरकार मदत करेल अशी ग्‍वाही दिली. मराठी भाषेसंबंधी पुरस्कार देणाऱ्या समितीचा मी अध्यक्ष आहे मात्र अनेक दिग्गज साहित्यिक या समितीमध्ये सदस्य आहेत त्यामुळे साहित्यिक पुरस्कार ठरवतील आणि मी केवळ त्यावर स्वाक्षरी करेल, असेही सामंत म्हणाले.

एका अर्थी तुम्‍ही दिल्‍ली जिंकली : डॉ. पी. डी. पाटील

यावेळी बोलताना डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, या कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित राहणे हा भाग्याचा क्षण आहे. संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी यापूर्वी दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काकासाहेब गाडगीळ यांच्यासोबत काम केले आहे, हा एक वेगळा योग आहे, असे म्हणत त्यांनी एकूण संमेलनाच्या आढावा घेत आयोजकांचे आणि महामंडळाचे अभिनंदन केले. एवढे चांगले आयोजन केले त्यामुळे एका अर्थी तुम्ही दिल्ली जिंकली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी बोलताना महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी या कार्यक्रमाविषयी बोलताना तीन दिवसीय कार्यक्रमाबद्दल भाष्य केले. पुढच्या संमलेनासाठी ३१ मार्च २०२५ ही आमंत्रण देण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी काही निमंत्रणे आली आहेत, यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, १८ व्या वर्षी महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणून तालकटोरा स्टेडियमला आले होते, आज साहित्य संमलेनाच्या समारोपीय कार्यक्रमात ८१ व्या वर्षी निरोप घेत असल्याचे म्हणाल्या.

मोदी यांना निमंत्रण देण्यामागे शरद पवार यांची कल्पना : संजय नहार

समारोपाच्या कार्यक्रमात निमंत्रक संजय नहार यांनी पंतप्रधान मोदी यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यामागचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, शरद पवार म्हणाले होते की, अगोदर दिल्लीत संमेलन झाले तेव्हा तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू आले होते. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावले पाहिजे. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन केला. त्यांनी लगेच होकार दिला. त्यानंतर ठरले की, पंतप्रधान मोदी यांचा सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनात कार्यक्रम घ्यायचा. याला साहित्य मंडळाने मंजुरी दिली. तसेच भांडायला मोठी जागा आहे मात्र दिल्लीत जेव्हा येऊ तेव्हा महाराष्ट्र एक आहे हे दाखवून दिले पाहिजे, असेही संजय नहार म्हणाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा

बेळगाव, बीदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा कार्यक्रमात देण्यात आल्या. सीमाभागातून आलेल्या नागरिकांनी अशाच घोषणा उद्घाटन कार्यक्रमात देखील दिल्या होत्या. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या घोषणा देखील काही जणांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT