तिरुअनंतपूर: एक तरुण २०१९ मध्ये घरातून अचानक बेपत्ता होताे...पोलीस तपास सुरु करतात तर तो पुन्हा परत येईल, या आशेवर कुटुंबातील सदस्यही त्याची वाट पाहतात... सलग काही वर्ष उलटतात बेपत्ता तरुणाच गूढ काही केल्या उकलत नाही....अखेर पोलीस पुन्हा एकदा फाईल ओपन करतात. तपासाला पुन्हा एकदा गती येत आणि भयानक आणि तितकंच धक्कादायक सत्य समोर येते. बेपत्ता तरुणाच्या मृतदेहाची विल्हेवाट मित्रांनीच लावल्याचे उघड हाेते.
केरळमधील कोळिकोड शहरात राहणारा विजिल हा घरातून बेपत्ता झाला. काही दिवस वाट पाहिल्यानंतर त्याचे वडील विजयन यांनी एलाथुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्या मित्रांचा शोध घेतला; पण त्या सर्वांनी दुपारी ३ च्या सुमारास अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर आपापल्या घरी निघून गेल्याचे सांगितले. तसेच विजिल ट्रेनमध्ये बसून अज्ञात ठिकाणी निघून गेल्याचेही त्यांनी चौकशीत सांगितले होते. त्यावेळी कोणालाही यावर शंका आली नाही. पोलिसंनी विजिलच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करताना, आम्हाला आढळले की त्याचा फोन त्याच दिवशी दुपारी २ वाजता बंद झाला होता. दुसऱ्या दिवशी हा फोन कोळिकोड शहरातच दुसऱ्या ठिकाणी थोड्या वेळासाठी चालू झाला आणि नंतर पुन्हा बंद झाला. यामुळे आम्ही असा निष्कर्ष काढला की विजिल एकतर जिवंत आहे किंवा त्याच्या मृत्यूनंतर किंवा हत्येनंतर कोणीतरी त्याचा मोबाईल घेतला आहे."
मित्रांनी त्यांच्या परिसरात अशी अफवा पसरवली की विजिलचे प्रेमप्रकरण होते, पण त्याचा मोठा भाऊ अविवाहित असल्यामुळे तो आपल्या मैत्रिणीसोबत पळून गेला आहे.
या प्रकरणी माहिती देताना कोळिकोड शहर पोलीस आयुक्त टी. नारायणन यांनी सांगितले की, पोलिसांना सुरुवातीपासून या प्रकरणी विजिलचे मित्र देत असलेल्या माहितीवर संशय होता. त्यामुळेच विशेष पथकाचे प्रमुख निरीक्षक के. आर. रणजित यांनी पुन्हा नव्याने तपास सुरू केला. त्यांनी पुन्हा एकदा विजिलच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी केली. मित्रांनी सांगितलं होतं की, विजिल दुपारी तीन वाजता घरी निघून गेला; पण त्याच्या फोनचं लोकेशन दुपारी २ वाजल्यापासून बंद असल्याचे आढळले. दुसऱ्या दिवशी थोड्या वेळासाठी तो फोन पुन्हा कोळिकोड शहरातच चालू झाला होता, असेही तपासात निष्पन्न झाले. हीच गोष्ट पोलिसांना संशयाच्या भोवऱ्यात घेऊन गेली. यावेळी पोलिसांनी तिन्ही आरोपींचे जबाब पुन्हा घेतले. यावेळी मात्र, त्यांच्या जबाबात काही किरकोळ विसंगती आणि त्रुटी आढळल्या. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. अखेर, निखिलने आपला गुन्हा कबूल केला.
२४ मार्च, २०१९ रोजी विजिल हा आपले मित्र निखिल, दीपेश आणि रणजित यांना भेटला. हे चौघेही चांगले मित्र होते. मात्र चौघेही अंमली पदार्थाच्या व्यसनाने ग्रासले होते. विजिल बेपत्ता झाला त्यादिवशी कोळिकोडच्या सरोवराम बायो पार्कजवळच्या एका निर्जन जागी मित्रांना भेटला. यावेळी विजिलने नेहमीपेक्षा जास्त अमली पदार्थांचं सेवन केलं. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. विजिल अचानक निपचित पडल्याचे पाहून निखिल, दीपेश आणि रणजित यांची भीतीने घाबरगुंडी उडाली. त्यांनी विजिलचा मृतदेह लपवण्याचा निर्णय घेतला. विजिल हा रेल्वेने शहरातून बाहेर गेला आहे, असे भासवण्यासाठी तिघांनी थेट रेल्वे स्टेशन गाठले. येथे त्याची दुचाकी पार्क केली. यानंतर ४८ तासांनी ते परत घटनास्थळी गेले. विजिलचा मृतदेह त्यांनी एका दलदलीच्या जागेत टाकला आणि त्यावर एक मोठा दगडही ठेवला.
विजिलचा मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्याचे. तिघे मित्र खूप घाबरले. आठ महिन्यांनंतर पश्चातापाने त्यांना इतकं ग्रासलं की, ते पुन्हा त्या दलदलीच्या जागेवर गेले. त्यांनी विजिलच्या मृतदेहाची हाडे गोळा केली. मृत मित्राच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हाटे वराक्कल समुद्रकिनाऱ्याजवळ विसर्जित केली.
अखेर सहा वर्षानंतर पोलिसांना बेपत्ता तरुणाचे गूढ उकलण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तिसरा आरोपी रणजित अद्याप फरार आहे. पोलिसांनी विजिलच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केरळ पोलिसांनी केलेल्या तपासामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, कोणताही गुन्हा हा कधीच लपत नाही तो उघड होतोच.