नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन कार्यालय तयार झाले असून याच महिन्यात पंतप्रधान नव्या कार्यालयात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय यांना नवीन "सेवा तीर्थ" संकुलात एकत्रितपणे जागा वाटप करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे कार्यालय असलेले "सेवातीर्थ संकुल" विजय चौकाजवळ रायसीना हिलच्या पायथ्याशी आहे.
यामध्ये सेवा तीर्थ १, सेवा तीर्थ २ आणि सेवा तीर्थ ३ अशी तीन उच्च तंत्रज्ञानायुक्त इमारती आहेत. यामध्ये पंतप्रधानांचे कार्यालय सेवा तीर्थ १ मध्ये असेल तर कॅबिनेट सचिवालय आधीच सेवा तीर्थ २ मध्ये हलविण्यात आले आहे. सेवा तीर्थ ३ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय असेल, जिथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल राहतील.
सेवातीर्थ संकुल सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग म्हणूनच विकसित करण्यात आले आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील नवीन संसद भवन आणि उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह आधीच पूर्ण झाले आहे. याच प्रकल्पात विविध मंत्रालयांसाठी एकूण ८ नवीन इमारती बांधल्या जाणार आहेत, त्यापैकी ३ आधीच पूर्ण झाल्या आहेत आणि काही मंत्रालये त्यात आधीच स्थलांतरित झाली आहेत.
पंतप्रधान कार्यालयाचे नाव "सेवा तीर्थ"
नवीन पंतप्रधान कार्यालयाचे नाव सेवा तीर्थ असणार आहे. यापूर्वीच देशभरातील राजभवनांचे नाव लोकभवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणजेच सेवातीर्थाच्या शेजारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे बांधकाम देखील सुरू आहे. यानंतर, पंतप्रधानांचे निवासस्थान ७, लोक कल्याण मार्गावरून सेवातीर्थ येथे हलवले जाईल.