प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा गौरव करण्यात आला.  
राष्ट्रीय

Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने देशातील २० मुलांचा सन्मान, महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा समावेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील २० बालकांना केले सन्मानित

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले. 

केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील २० बालकांना २०२५ या वर्षासाठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. दरम्यान, या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते.

शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या बालकांना गौरविण्यात आले. यापैकी दोघांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारार्थीमध्ये ९ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे.

पुरस्कृत बालक भारताच्या अमृत पिढीचे प्रतिनिधी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

'राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून ही बालके भारताच्या अमृत पिढीचे खरे प्रतिनिधी आहेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि इतर आव्हानांवर मात करून शौर्य, कला-संस्कृती, पर्यावरण, नवाचार, विज्ञान, समाजसेवा व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. हा पुरस्कार युवा पिढीतील शौर्य, धैर्य आणि संवेदनशीलतेला प्रोत्साहन देणारा ठरेल, असे त्या म्हणाल्या. या मुलांच्या संकल्प आणि प्रयत्नांमुळे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असा विश्वास राष्ट्रपती यांनी यावेळी व्यक्त केला.  

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा गौरव

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षीय अर्णव महर्षी यास विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार' प्रदान करण्यात आला. लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांसाठी एआय-आधारित पुनर्वास उपकरण आणि अॅक्टिव्ह हँड रिस्ट बँड तयार करणाऱ्या अर्णव महर्षी याने स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने हे नवोन्मेषी उपकरण विकसित केले आहे.

पुरस्कार विजेत्यांची नावे

अर्णव महर्षि - विज्ञान तंत्रज्ञान - महाराष्ट्र

व्योमा प्रिया - शौर्य - तमिळनाडू (मरणोत्तर)

कमलेश कुमार - शौर्य - बिहार (मरणोपरांत)

मोहम्मद सिडान पी - शौर्य - केरळ  

अजय राज - शौर्य - उत्तर प्रदेश  

एस्थर लालदुहोमि - कला संस्कृती - मिझोरम  

सुमन सरकार - कला संस्कृती - पश्चिम बंगाल  

पूजा - पर्यावरण - उत्तर प्रदेश  

शवन सिंह - सामाजिक सेवा - पंजाब  

वंश तायल - सामाजिक सेवा - चंदीगड  

आइशी प्रिशा - विज्ञान तंत्रज्ञान - आसाम  

शिवानी उपारा - क्रीडा - आंध्र प्रदेश  

वैभव सूर्यवंशी - क्रीडा - बिहार  

योगिता मंडावी - क्रीडा - छत्तीसगड  

लक्ष्मी प्रगयिका - क्रीडा - गुजरात  

ज्योति - क्रीडा - हरियाणा  

अनुष्का कुमारी - क्रीडा - झारखंड  

धिनिधि देसिंगु - क्रीडा - कर्नाटक  

ज्योषणा सबर - क्रीडा - ओडिशा  

विश्वनाथ कार्तिके - क्रीडा - तेलंगणा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT