PM Modi UK Maldives Visit
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ते २६ जुलै दरम्यान ब्रिटन आणि मालदीव या दोन देशांचा दौरा करणार आहेत. द्विपक्षीय व्यापार करार आणि राजकीय सहभागातून राजनैतिक संबंध मजबूत करण्याचा या दौऱ्याचा उद्देश आहे.
पंतप्रधान मोदी २३ ते २४ जुलै रोजी दरम्यान ब्रिटनचा दौरा करतील. यात भारत- ब्रिटन द्विपक्षीय मुक्त व्यापार करारावर (FTA) शिक्कामोर्तब होईल. या करारामुळे ब्रिटनमध्ये होणाऱ्या भारतीय निर्यातीपैकी ९९ टक्के निर्यातीवर टॅरिफ कमी होईल. यामुळे व्हिस्की आणि कारसारख्या ब्रिटनमधून भारतात होणाऱ्या आयातीला चालना मिळेल. दोन्ही देशांदरम्यान अनुकूल असे व्यापार धोरण राबवण्यासाठी तीन वर्षे वाटाघाटी करण्यात आल्या आणि आता प्रत्यक्षात द्विपक्षीय व्यापार करार होणार आहे.
भारत-ब्रिटनदरम्यानच्या मुक्त व्यापार करारामुळे (India-UK Free Trade Agreement) व्यापारात लक्षणीयरीत्या वाढ होण्याची आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्यापारातील अडथळे कमी करण्यावर दोन्ही देशांचा भर असेल.
पीएम मोदी २५ ते २६ जुलै दरम्यान मालदीवला भेट देतील. तिथे ते ६० व्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पीएम मोदींचा मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या नेतृत्त्वाखालील मालदीवचा हा पहिलाच दौरा असेल. पीएम मोदींनी मालदीवचा शेवटचा दौरा जून २०१९ मध्ये केला होता.
मालदीवच्या काही नेत्यांनी 'इंडिया आउट' मोहीम उघडली होती. तसेच त्यांच्या चीन समर्थक भूमिकेमुळे अलिकडच्या काळात भारत- मालदीव संबंधात तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर मोदींचा हा पहिलाच दौरा असेल.
राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू ऑक्टोबर २०२४ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या भारत भेटीतून द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा मालदीवचा प्रयत्न असल्याचे संकेत मिळाले होते. तर पीएम मोदींचा द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यावर भर राहील.