पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात (Maha Kumbh Mela 2025) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज बुधवारी (दि. ५ फेब्रुवारी) सहभागी झाले. त्यांनी इथल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान आणि पूजा केली. यावेळी पीएम मोदी यांनी भगवे वस्त्र परिधान केले होते. त्यांच्या गळ्यात आणि हातात रुद्राक्षाची माळ होती. त्यांनी मंत्रोच्चरादरम्यान संगमात आस्थेची डुबकी घेतली. त्यानंतर त्यांनी गंगापूजन केले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सूर्यदेवाची आराधना केली. त्यांनी पवित्र स्नान केल्यानंतर मंत्रांचा जपही केला. संगमात स्नान केल्यानंतर पीएम मोदी यांनी पूजादेखील केली. पंतप्रधान मोदी महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्याने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभमेळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी संगमात पवित्र स्नान करुन पूजा केली होती.
पीएम मोदी आज सकाळी बमरौली विमानतळावर पोहोचले. येथे त्यांचे राज्यपाल आनंदीबेन पेटल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. विमानतळावरून हेलिकॉप्टरमधून पीएम मोदी हेलिपॅडवर पोहोचले. तेथून ते अरैलीच्या घाटावर आले. तेथून ते बोटीतून संगमावर पोहोचले.
उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारीपासून सुरु झालेल्या या महाकुंभमेळ्यात ४ फेब्रुवारीपर्यंत ३८.२९ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले आहे. आज महाकुंभमेळ्यात पीएम मोदी सहभागी झाले.
चार दिवसांपूर्वी १ फेब्रुवारी रोजी ७७ देशांच्या ११८ सदस्यांच्या राजदुतांच्या शिष्टमंडळाने महाकुंभात पवित्र स्नान केले होते. यात रशिया, मलेशिया, बोलिविया, झिम्बाब्वे, लातविया, उरुग्वे, नेदरलँड, मंगोलिया, इटली, जपान, जर्मनी, जमैका, अमेरिका, स्वित्झर्लंड, स्वीडन, पोलंड, कॅमेरुन, युक्रेन आणि अर्जेंटिना या देशांच्या राजदुतांचा समावेश होता.