गया (बिहार); वृत्तसंस्था : ज्या पक्षांचे बहुतेक नेते एकतर तुरुंगात आहेत किंवा जामिनावर बाहेर आहेत, तेच पक्ष घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलावर टीकेची झोड उठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गया येथे एका भव्य सभेत बोलत होते. त्यांनी बिहारच्या विकासासाठी एनडीए सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवातच राजद आणि काँग्रेसच्या धोरणांवर टीका करून केली. ते म्हणाले, ज्या पक्षांचे बहुतेक नेते एकतर तुरुंगात आहेत किंवा जामिनावर बाहेर आहेत, ते पक्ष घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आहेत. गंभीर आरोपांखाली अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना 30 दिवसांत पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावित विधेयकाचा संदर्भ देत त्यांनी हा आरोप केला.
राजद आणि काँग्रेसच्या राजवटीत बिहारमध्ये एकही मोठा प्रकल्प पूर्ण झाला नाही. त्यांनी लोकांच्या भल्याचा कधी विचारच केला नाही. ते फक्त स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त होते, असा घणाघात मोदींनी केला. त्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांवर बिहारच्या जनतेला केवळ ‘व्होट बँक’ म्हणून वापरल्याचा आरोपही केला. भाषणाच्या शेवटी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत मोदी म्हणाले, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी आपल्या नागरिकांची हत्या केल्यानंतर मी बिहारच्या भूमीवर दिलेले वचन पूर्ण केले आणि त्या हल्ल्याचा बदला घेतला. मोदींच्या या दुहेरी संदेशामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे, ज्यात एका बाजूला विरोधकांवर हल्ला आणि दुसर्या बाजूला विकासाचे आश्वासन आहे.
सीमावर्ती भागातील घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी गंभीर चिंता व्यक्त केली. बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचे संतुलन वेगाने बदलत आहे. राजद आणि काँग्रेस या घुसखोरांना पाठिंबा देत आहेत. हे तुष्टीकरणाचे राजकारण आहे आणि आम्ही बिहारच्या लोकांचे हक्क घुसखोरांना घेऊ देणार नाही, असे ते म्हणाले. बिहारच्या जनतेने अशा पक्षांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
टीकेसोबतच मोदींनी बिहारसाठीच्या विकासकामांचा पाढा वाचला. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमुळे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.