नवी दिल्ली : भारताचा इतिहास शौर्य, समरसता आणि सहकार्याच्या परंपरेने घडला आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी गुरु परंपरेतील त्याग आणि सामाजिक एकात्मतेचा विशेष उल्लेख केला. सत्य आणि धर्मासाठी अढळ राहण्याची प्रेरणा आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त नवी मुंबई येथे आयोजित समागमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी होत संबोधित केले. या ऐतिहासिक आणि पवित्र कार्यक्रमाचा भाग होणे ही मोठी भाग्याची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाला सामाजिक ऐक्याची आवश्यकता असताना हे मोठे संमेलन राष्ट्राला आश्वस्त करणारे आहे. गेल्या वर्षी नागपूर येथे सुरू झालेला शहादत समागमाचा प्रवास तख्त श्री हजूर साहिब येथे अधिक दृढ झाला आणि आता नवी मुंबईत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर यांचा इतिहास महाराष्ट्रातील हजारो गावांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले.
केंद्र सरकारकडून गुरु साहिबांशी संबंधित ऐतिहासिक पर्व राष्ट्रीय स्तरावर साजरे करण्यात येत असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी गुरु नानक देव यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वाचे आयोजन, तसेच ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची परंपरा यांचा उल्लेख केला. शीख समाजाच्या श्रद्धास्थानांशी संबंधित सुविधा वाढविणे, करतारपूर साहिब कॉरिडॉरची उभारणी, हेमकुंड साहिब यात्रेसाठी पायाभूत सुविधा आणि शालेय अभ्यासक्रमात शीख इतिहासाला स्थान देणे यांसारख्या निर्णयांचा त्यांनी आढावा घेतला. इतिहास केवळ स्मरणासाठी नसतो, तो आपल्या आचरणात उतरवण्यासाठी असतो. धैर्य आणि सत्यासाठी उभे राहण्याची भावना नवीन पिढीने जोपासली, तर परंपरा भविष्याचा मार्गदर्शक ठरेल, असेही प्रतिपादन त्यांनी समारोप करताना केले.