PM Narendra Modi 
राष्ट्रीय

PM Narendra Modi |५५ व्या प्रगती बैठकीत पंतप्रधानांकडून ७८ हजार कोटींच्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा!

55 वी प्रगती मिटींग, प्रकल्प बांधकामाच्या गुणवत्तेशी तडजोड न करण्याचा सल्ला

Namdev Gharal

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ५५ व्या प्रगती बैठकीत देशातील ७८ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या पाच महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. रस्ते, वीज, कोळसा आणि रेल्वे क्षेत्रातील या प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारांना दिले. प्रकल्प पूर्ण करताना बांधकामाच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सेवा तीर्थ येथे झालेल्या या बैठकीत प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडथळे, केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पांना होणाऱ्या विलंबामुळे केवळ खर्च वाढत नाही, तर नागरिक, उद्योग आणि अर्थव्यवस्थेला मिळणारे फायदेही लांबणीवर पडतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले. प्रलंबित प्रश्नांची जबाबदारी निश्चित करून वास्तववादी कालमर्यादेत त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

रस्ते प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने करण्यासोबतच खर्चापेक्षा प्रत्यक्ष परिणामांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. कोळसा प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन आणि पुनर्स्थापना वेळेत व सन्मानपूर्वक करण्यावरही त्यांनी भर दिला. वीज क्षेत्रात विकेंद्रित सौर आणि पवनऊर्जा प्रकल्पांची उभारणी वीज वापराच्या केंद्रांजवळ करण्याच्या पर्यायांचा विचार करण्याची सूचना त्यांनी केली. यामुळे वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह आणि परवडणारा होण्यासोबतच पारेषण यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) व्यवस्थेचा आणि पीएम-सेतू योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. आयटीआयचे आधुनिकीकरण आणि उद्योगांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी (पीएसयू) भविष्यातील मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन आयटीआयशी भागीदारी वाढवावी, प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि अप्रेंटिसशिपच्या संधी द्याव्यात, तसेच प्रशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगारात प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सुचविले.

आयटीआयमधील अभ्यासक्रम स्थानिक औद्योगिक समूह आणि संबंधित क्षेत्रांच्या गरजांनुसार तयार करण्यावरही त्यांनी भर दिला. यामुळे तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. यासाठी 'क्लासरूम-कंपनी-करिअर' हे मॉडेल राबविण्याची संकल्पना त्यांनी मांडली. वर्गातील शिक्षण, उद्योगांमधील प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार व करिअरची संधी अशी या मॉडेलची संकल्पना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT