Donald Trump Rally Shooting
ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 
राष्ट्रीय

Donald Trump Rally Shooting : पीएम मोदींकडून ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराचा निषेध , म्हणाले; ‘मित्रावर झालेल्या हल्ल्याची चिंता’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Donald Trump Rally Shooting : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक रॅलीदरम्यान गोळीबार झाला आहे. या गोळीबाराच्या घटनेत गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. त्यांच्या कानातून रक्त वाहत असल्याचे छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे. या प्राणघातक हल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. जखमी ट्रम्प यांना घटनास्थळावरून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते आहे. ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी खेद आणि चिंता व्यक्त केली

  • पंतप्रधान मोदी म्हणाले, राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही

पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, ‘माझे मित्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने मी अत्यंत चिंतित आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.’

हल्लेखोरांनी अनेक गोळ्या झाडल्या

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प पेनसिल्व्हेनियाच्या बटलरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. त्यांचे भाषण सुरू असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोरांनी ट्रम्प यांच्या दिशेने एकामागून एक अनेक झाडल्या. त्यातील एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. अचानक झालेल्या या हल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी चपळाईने ट्रम्प यांना वाचवले तसेच 20 वर्षीय हल्लेखोराला ठार केले. ट्रम्प यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोर हा पेनसिल्व्हेनियाचा रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. दुर्दैवाने या हल्ल्यात एका नागरिकाला जीव गमवावा लागला आहे.

जो बिडेन यांची प्रतिक्रिया

या हल्ल्याबाबत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘मला पेनसिल्व्हेनियामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाली आहे. मी त्यांच्यासोबत आहे. त्याच्यावरील हल्ल्याचा मी निषेश करतो. ते लवकर बरे व्हावेत अशी इश्वर चरणी प्रार्थना करतो.’ .

SCROLL FOR NEXT