PM Narendra Modi | अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींची भाजप संसदीय समितीसोबत बैठक! 
राष्ट्रीय

PM Narendra Modi | अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींची भाजप संसदीय समितीसोबत बैठक!

महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या निवासस्थानी भाजप संसदीय पक्षाच्या कार्यकारी समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रातील खासदार अनिल बोंडे, मेधा कुलकर्णी आणि स्मिता वाघ यांचीही बैठकीला उपस्थिती होती.

बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर सांगितले की, 'भाजप संसदीय पक्षाच्या कार्यकारी समितीसोबत ७, लोककल्याण मार्ग येथे खूप चांगली बैठक झाली. यात विविध विषयांवर फलदायी चर्चा झाली,' असेही ते म्हणाले.  

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत ३० हून अधिक मंत्री आणि खासदार सहभागी झाले होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचाही बैठकीत समावेश होता. संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संसदीय रणनीती, खासदारांमधील समन्वय आणि आगामी कामकाजाबाबत चर्चा झाल्याचे समजते. विशेषतः घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत, मतदानावेळी खासदारांची उपस्थिती आणि सरकारची भूमिका यांसारखे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. 

दरम्यान, भाजपने आपल्या लोकसभा खासदारांसाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत सर्व खासदारांनी लोकसभेत उपस्थित राहावे आणि सरकारच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाची विधायी कामे या कालावधीत मंजुरीसाठी येणार असल्याचे व्हीपमध्ये नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, पंतप्रधान मोदी यांनी रविवारी स्वतंत्र व्हिडिओ संदेशाद्वारे महिला आरक्षणाच्या घटनादुरुस्तीला पाठिंबा देण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले. 'नारी शक्ती वंदन दुरुस्ती ही काळाची गरज आहे. महिलांच्या राजकीय सहभागाचे स्वप्न आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टीने हे आश्वासन पूर्ण करणे आवश्यक आहे,' अशी भूमिका त्यांनी मांडली. महिलांना राजकीय व्यवस्थेत अधिक प्रतिनिधित्व देण्याचा संकल्प भाजप-एनडीएचा कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संसदेच्या विशेष अधिवेशनात संविधानाची १३२ वी घटनादुरुस्ती आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयक मांडले जाणार आहे. लोकसभेच्या सदस्यसंख्येत वाढ, राज्यांना मिळणाऱ्या जागांचे पुनर्निर्धारण आणि २०२९ च्या निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू करण्याच्या प्रस्तावामुळे या अधिवेशनाकडे देशाचे लक्ष लागले आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT