पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  File Photo
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

Pm Narendra Modi | मुख्यमंत्री फडणवीस करणार प्रशासनात बदल ?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : राज्याच्या कारभारात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी प्रयत्न करा, यासाठी कुणाचीही पर्वा करू नका, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे समजते. त्यामुळे पंतप्रधानांच्या या कानमंत्रानंतर मुख्यमंत्री फडणवीस राज्य प्रशासनात काय बदल करतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गेला काही दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्ली सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी २० फेब्रुवारीला पार पडला. त्यानंतर २१ फेब्रुवारीला ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. या दोन्ही कार्यक्रमाच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद झाला. दरम्यान, दिल्ली सरकारच्या शपथविधीच्या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये भेटही झाली. या भेटीप्रसंगी पंतप्रधानांनी काही महत्त्वाच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिल्या. यामध्ये प्रामुख्याने प्रशासनात पारदर्शकता, शिस्त आणि प्रामाणिकता असली पाहिजे. महत्वाची कामे वेळेत आणि गतीने झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करा आणि हे करण्यासाठी कोणाचीही पर्वा करू नका, उद्दिष्ट महत्त्वाचे आहे, अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमधील चर्चेत असलेली प्रकरणे, महायुतीमधील कुरबुरी यांची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांकडे राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या दृष्टीने बघितले जात आहे.

प्रचंड बहुमतासह महायुतीच्या सरकारने सत्तेत पुनरागमन केले आहे. प्रचंड बहुमत असलेल्या महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. महायुतीमध्ये सत्ता वाटपावरून नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे विविध मुद्यावरून सरकारमधील मंत्री, आमदार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या सगळ्या घडामोडी दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कानमंत्र दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आहेत. भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारचा भाग आहेत. सरकार आल्यापासून आधी सरकार स्थापनेची प्रक्रिया लांबली, त्यानंतर पालकमंत्री वाटप लांबले आणि अजूनही पालकमंत्री पदावरून तिढा सुरूच आहे. यातच काही मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य समोर आले तर काहींच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या सूचनांचे परिवर्तन कशात होईल, याचा निकाल लवकरच दिसण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ फेरबदल की काहींना डच्चू?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिलेला या सूचना अर्थातच गांभीर्याने घेतल्या जातील. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या काही मंत्र्यांना डच्चू दिले जाईल, प्रशासकीय यंत्रणेत काही फेरबदल केले जातील, मंत्रिमंडळात काही बदल केले जातील यावरूनही चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्य वाढण्याची शक्यता आहे. मात्र पंतप्रधानांच्या सूचना महायूतीतील इतर पक्ष किती गांभीर्याने घेतात हे महत्वाते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT