US on Pahalgam Terror Attack
दिल्ली : दहशतवाद संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका आणि ट्रम्प प्रशासनाकडून पूर्ण पाठिंबा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सरकारांशी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत संपर्कात आहेत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना ब्रूस म्हणाल्या की, अमेरिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्याशी केलेल्या संभाषणाचा उद्धृत केला.
"आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. काल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींना सांगितले की, दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी आहे आणि पंतप्रधान मोदींना आमचा पूर्ण पाठिंबा आहे," असे त्या म्हणाल्या. तणाव कमी करण्याच्या आवाहनांना प्रतिसाद दिला जात आहे का असे विचारले असता ब्रूस म्हणाल्या, आम्ही दोन्ही पक्षांकडून जबाबदार तोडगा मागत आहोत.
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व्यापक प्रादेशिक संघर्ष टाळण्यासाठी काळजीपूर्वक प्रतिसाद देईल, अशी अशा असल्याचे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी गुरुवारी सांगितले. पाकिस्तान जबाबदारीनुसार त्यांच्या हद्दीत कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारताला सहकार्य करेल, असेही ते पुढे म्हणाले. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्हान्स यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केले. पहलगाम दहशतवादी हल्ला झाला तेव्हा व्हान्स कुटुंबासह भारत दौऱ्यावर आले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर व्हान्स यांचे हे विधान महत्त्वाचे आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून युद्धबंदी उल्लंघनात वाढ झाली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना गोळ्या घातल्या. दहशतवादाला पाठिंबा दिल्याबद्दल भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कडक उपाययोजना केल्या आहेत. सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. अटारी येथील एकात्मिक तपासणी नाके बंद केले आहेत. सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सशस्त्र दलांना दिले आहे.