Bihar Elections PM Modi Viral Video Gamcha:
नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय वातावरण रंगू लागले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ प्रचंड गाजत आहे. शुक्रवारी मोदींचे हेलिकॉप्टर मुजफ्फरपूर येथे उतरले, तेव्हा हजारो समर्थकांनी ‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मोदींनी आपल्या खास शैलीत मधुबनी प्रिंट असलेला गमछा हातात घेत फिरवला आणि लोकांना अभिवादन केले. या क्षणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदींनी सुमारे ३० सेकंद हसून गमछा फडकावला आणि गर्दीकडे हात हलवत राहिले. त्यानंतर ते आपल्या पुढील सभेसाठी छपरा येथे रवाना झाले. बिहारमध्ये मोदींना अशा प्रकारे गमछा फिरवून अभिवादन करताना पाहण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ऑगस्टमध्येही त्यांनी औंटा-सिमरिया पुलाचे उद्घाटन केल्यानंतर याच पद्धतीने समर्थकांना अभिवादन केले होते. स्वातंत्र्य दिनासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीही पारंपरिक वेशभूषा, फेटे आणि गमछा वापरून स्थानिक संस्कृतीचा आदर करण्याची मोदींची परंपरा राहिली आहे.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, बिहारमध्ये पंतप्रधान मोदींनी गमछा लहरवणं हा एक प्रतीकात्मक संदेश आहे. बिहार आणि बंगालसारख्या उष्ण व दमट राज्यांमध्ये, गमछा हा सामान्य माणूस, विशेषतः शेतकरी आणि कष्टकरी वर्ग यांची ओळख मानला जातो. हा फक्त घाम पुसण्याच कापड नसून, तो मेहनती वर्गाच्या जीवनशैलीचं प्रतीक आहे.
ऊन किंवा धूळ यापासून बचाव करण्यासाठी डोक्याला बांधणे, शेतीच्या कामात किंवा रोजच्या पोषाखात गमछा वापरला जातो. याच कारणामुळे राजकीय पक्षांनी याला लोकसंपर्काचे प्रतीक म्हणून स्वीकारले आहे. मोदींनी गमछा लपेटून आपण शेतकरी आणि मजुरांसोबत आहोत हे दाखवण्याचा आणि त्याच वर्गाशी जवळीक साधण्याचा संदेश दिला आहे.
आर्थिक सर्वेक्षणानुसार, बिहारमधील सुमारे ५३.२ टक्के लोकसंख्या शेती क्षेत्राशी निगडीत आहे. याशिवाय मोठ्या संख्येने भूमिहीन मजूर आणि स्थलांतरित कामगार आहेत, जे निवडणुकीच्या निकालांवर निर्णायकपणे परिणाम करतात.