पुढारी ऑनलाईन डेस्क : PM Narendra Modi BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.) भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटलंय की, 6 एप्रिल हा दिवस भारतीय जनता पक्षाच्या देशाच्या प्रगतीसाठी असलेल्या अतुलनीय बांधिलकीच्या पुनःप्रत्ययाची जाणीव करून देतो. देशातील जनतेनेही पक्षाच्या चांगल्या शासनाचा अनुभव घेतला आहे, ज्याचे प्रतिबिंब मागील वर्षांमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक जनादेशांमध्ये दिसून आले आहे.’
ते पुढे म्हणातात, ‘भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा. गेल्या कित्येक दशकांपासून ज्यांनी आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी स्वतःला समर्पित केले, अशा सर्वांचे आज स्मरण करतो. हा महत्त्वाचा दिवस भारताच्या प्रगतीसाठी आणि विकसित भारताच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आपल्या अतुलनीय बांधिलकीची पुनःप्रतीज्ञा घेण्याची प्रेरणा देतो,’ असे पोस्टमध्ये लिहिले आहे.
भाजपच्या शासनधोरणाला जनतेचा मिळालेला पाठिंबा अधोरेखित करताना त्यांनी लिहिले, ‘भारतीय जनता आपल्या पक्षाचे चांगले शासन पाहत आहे, ज्याचे प्रतिबिंब गेल्या काही वर्षांमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक जनादेशांमध्ये दिसून आले आहे. लोकसभा निवडणुका असोत, विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुका असोत किंवा देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत, जनतेने भाजप आणि मित्र पक्षांच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. आमचे सरकार समाजाची सेवा करत राहतील आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करतील.’
‘भाजपचे कार्यकर्ते हे पक्षाचा कणा आहेत. सर्व परिश्रमी कार्यकर्त्यांना भाजपच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ते समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये, देशाच्या प्रत्येक भागात अविरतपणे 24 तास मेहनत करून गरिब, वंचित आणि उपेक्षित लोकांची सेवा करत आहेत. तसेच ते आपल्या उत्तम शासनाच्या अजेंड्याचा प्रसार करत आहेत. याचा मला अभिमान आहे. कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि उत्साह खरोखर प्रेरणादायक आहे,’ असेही पोस्टमध्ये नमूद केले आहे.