नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
यमुना नदीला दिल्लीची ओळख बनवणार, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. 'आप'ला भ्रष्टाचारी आणि काँग्रेसला परजीवी म्हणत त्यांनी निशाणा साधला. तसेच दिल्ली विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडला जाईल आणि भ्रष्टाचाराची कसून चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. ज्यांनी लूटले त्यांना परतवावे लागणार, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यमुनेच्या स्वच्छतेचे आश्वासन देताना म्हणाले की, हे काम कठीण, जास्त वेळ चालणार आहे. गंगा नदीचे काम राजीव गांधींच्या काळापासून सुरू आहे. कितीही वेळ लागला, कितीही शक्ती लागली तरीही यमुना नदीची सेवा करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने आज स्पष्ट केले आहे की दिल्लीचा खरा मालक जनताच आहे. ज्यांना दिल्लीचा मालक होण्याचा घमंड होता त्यांना दिल्लीने नाकारले. दिल्लीच्या जनादेशाने राजकारणामध्ये खोटेपणाला कोणताही थारा नाही, हे स्पष्ट केले. जनतेने शॉर्टकटच्या राजकारणाचे शॉर्टसर्किट केले, असा हल्लाबोल त्यांनी ‘आप’वर केला.
लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर आम्ही पहिल्यांदा हरियाणा मध्ये रेकॉर्ड केला त्यानंतर महाराष्ट्रात नवा विक्रम केला. आता दिल्लीत नवा इतिहास रचला आहे, असे मोदी म्हणाले. दिल्ली फक्त एक शहर नाही तर दिल्ली हा लघु भारत आहे. एक भारत श्रेष्ठ भारताच्या विचाराला दिल्ली जगते. दिल्लीत दक्षिण भारत, पूर्व, पश्चिम भारत अशा सर्व भागातील लोक आहेत. दिल्ली विविधतेने नटलेल्या भारताचे लघुरूप आहे. याच दिल्लीने भाजपला प्रचंड आशीर्वाद दिला.
पूर्वांचलवर दाखवला विश्वास
पंतप्रधान म्हणाले की, मी पूर्वांचल मधून खासदार आहे. पूर्वांचलसोबत माझी आपुलकीपणाची भावना आहे. दिल्लीतील पूर्वांचल मतदारांनी दिलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, अयोध्येच्या मिल्कीपुरमध्ये देखील भाजपाला शानदार विजय मिळाला आहे. प्रत्येक समाजाने भाजपासाठी मतदान केले. आज तुष्टीकरण नाही तर भाजपाच्या संतुष्टीकरणाच्या धोरणाला निवडत असल्याचे ते म्हणाले.
नारीशक्तीला दिलेले आश्वासन पूर्ण करणार
दिल्ली निवडणुकीत नारीशक्तीला दिलेले आश्वासन पूर्ण कऱणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. दिल्लीत गरीब झोपडीत राहणारे, मध्यम वर्ग यांसह सर्वांनी भाजपला जबरदस्त समर्थन दिले. देशाच्या नारीशक्तीचा आशिर्वाद आमचा सर्वात मोठा रक्षाकवच आहे.
काँग्रेस मित्र पक्षाला संपवत असल्याचा आरोप
काँग्रेस सर्व मित्र पक्षांना संपवत आहे, असा आरोप त्यांनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केला. काँग्रेस मित्र पक्षांचे मुद्दे चोरतो आणि मित्र पक्षांच्या मतपेढी हिसकावण्याचा प्रयत्न करतो. उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पक्ष आणि बसपाची मतपेढी हिसकावण्याचा काँग्रेसने प्रयत्न केले असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले की, २०१४ पासून पुढील पाच वर्षे हिंदू बनण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. त्यांना वाटले की भाजपची मतपेटी फोडून आपले राजकारण करता येईल. मात्र त्यांची डाळ शिजली नाही. मागच्या काही वर्षांपासून त्यांनी तो रस्ता बंद केला. त्यामुळे आता ते वेगवेगळ्या राज्यातील प्रादेशिक पक्षांवर नजर ठेवून आहेत. काँग्रेस प्रादेशिक पक्षांना संपवत आहे. ही खेळी प्रादेशिक पक्षांना समजली आहे, असे ते म्हणाले. म्हणून इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांनी काँग्रेसला दिल्लीत रोखण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडी पक्ष दिल्लीत काँग्रेसच्या विरोधात एकजूटीने उतरले होते.
नितीश कुमार आणि चंद्राबाबूची केली प्रशंसा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या कामाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. दोन्ही राज्यांमध्ये या दोन नेत्यांनी उत्तम काम केल्याचे ते म्हणाले. पूर्ण देश जाणतो जिथे एनडीए सरकार आहे तिथे सुशासन विकास आणि विश्वास आहे. एनडीएचा प्रत्येक उमेदवार लोकांच्या हितासाठी काम करतो. देशात एनडीएला जिथे जनादेश मिळाला आहे. आम्ही त्या राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचवले आहे. त्यासाठी भाजपला सलग विजय मिळत आहे. लोक आमच्या सरकारला दुसरी तिसरी वेळा निवडत आहेत. उत्तराखंड, हरियाणा उत्तर प्रदेश गुजरात गोवा, महाराष्ट्र बिहार आसामा अरुणाचल प्रदेशात प्रत्येक राज्यात आम्हांला पून्हा सत्ता मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवार योजनेची दखल
पंतप्रधान म्हणाले की, महाराष्ट्रात दुष्काळामुळे मोठे संकट यायचे आमच्या सरकारने जलयुक्त शिवार मोहीम सुरु करुन चांगले काम केले. हरियाणात बिना खर्ची बिना पर्ची नोकरी मिळत नव्हती. तिथल्या लोकांना आम्ही विकास दाखवला. नितीश कुमार यांच्या अगोदर बिहार कसा होता. आंध्र प्रदेश मध्ये चंद्राबाबू नायडू यांनी काम केले आहे. हे सर्व उदाहरण सांगतात एनडीए म्हणजे विकासाठी गॅरंटी आहे. आमच्या सुशासनाचा लाभ गरीबालाही होतो आणि मध्यमवर्गालाही होतो, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी भाषणात अण्णा हजारेंची काढली आठवण
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आप’दा वाले राजकारणात आले तेव्हा म्हणाले होते की, आम्ही राजकारण बदलू. मात्र हे कट्टर बेईमान निघाले. आज अण्णा हजारे यांचे वक्तव्य ऐकत होतो. अण्णा हजारे खूप वेळापासून ‘आप’दा वाल्यांच्या कुकर्माची पीडा झेलत होते. आज त्यांना पण ‘आप’दापासून मुक्ती मिळाली असेल. ज्या पक्षाचा जन्मच भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनाने झाला होता. तोच पक्ष भ्रष्टाचार करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.