पंतप्रधान नरेंद्र मोदी. Pudhari news
राष्ट्रीय

PM Narendra Modi : संशोधनासाठी वर्षभरात २४ हजार कोटींची नवी गुंतवणूक - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

‘एमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह २०२६’ चे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताने केवळ जगात विकसित होणारे तंत्रज्ञान स्वीकारण्याऐवजी स्वतः नवे तंत्रज्ञान विकसित करावे आणि जागतिक समस्यांवर उपाय देण्यात नेतृत्व करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. संशोधन आणि विकासासाठी गेल्या वर्षभरात सरकारी आणि खासगी क्षेत्राकडून मिळून २४ हजार कोटी रुपयांची नवी गुंतवणूक करण्याची बांधिलकी व्यक्त करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर, अणुऊर्जा, अंतराळ संशोधन आणि क्वांटम तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत भारताने स्वयंपूर्णतेसह जागतिक नेतृत्वाचे लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

राजधानी दिल्लीत आयोजित ‘एमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. या तीन दिवसीय परिषदेत वैज्ञानिक, संशोधक, उद्योग प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि स्टार्टअप क्षेत्रातील उद्योजक सहभागी झाले आहेत.

संशोधनासाठी २४ हजार कोटींची बांधिलकी

संशोधन, विकास आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी मागील वर्षी एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या वर्षभरात बाजारपेठेत दाखल होण्याच्या टप्प्यावर असलेल्या तंत्रज्ञानासाठी सरकारने सुमारे १२ हजार कोटी रुपयांची बांधिलकी व्यक्त केली आहे. खासगी क्षेत्राकडूनही तेवढीच गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे संशोधन आणि विकासासाठी एकूण २४ हजार कोटी रुपयांची नवी गुंतवणूक अपेक्षित असल्याचे मोदी यांनी सांगितले. भारतातील पेटंट अर्जांची संख्याही वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी वर्षभरात ५० हजारांपेक्षा कमी पेटंट अर्ज दाखल होत होते. गेल्या वर्षी ही संख्या सुमारे दीड लाखांपर्यंत पोहोचली. ही वाढ देशातील संशोधन आणि नवोन्मेषाची संस्कृती बळकट होत असल्याचे निदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अणुऊर्जा, अंतराळ आणि एआयमध्ये प्रगती

भारताच्या ५०० मेगावॅट क्षमतेच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिअॅक्टरने ‘फर्स्ट क्रिटिकलिटी’चा टप्पा गाठल्याचा उल्लेख करत मोदी यांनी अणुऊर्जेतील प्रगती अधोरेखित केली. अंतराळ क्षेत्रात भारतीय स्टार्टअपने स्वदेशी रॉकेटद्वारे पहिल्याच प्रयत्नात उपग्रह कक्षेत स्थापित केल्याचे आणि भारताने उपग्रह डॉकिंगची क्षमता प्राप्त केल्याचेही त्यांनी सांगितले. भारतात विकसित झालेल्या चिप्सच्या पहिल्या खेपा जागतिक बाजारपेठेत पोहोचू लागल्याचे नमूद करत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, बॅटरी साठवणूक आणि स्वदेशी संचार तंत्रज्ञानातील प्रयत्नांची माहिती दिली.

‘एआयने विचारशक्ती मर्यादित होऊ नये’

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे संशोधनातील नियमित कामे वेगाने होऊ शकतात. मात्र त्यामुळे वैज्ञानिकांची स्वतंत्र विचारशक्ती मर्यादित होता कामा नये, असे मोदी यांनी स्पष्ट केले. एआयने दिलेल्या उत्तरांची सत्यता तपासण्याची जबाबदारी वैज्ञानिकांचीच आहे, असेही ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ प्रगत साधने विकसित करण्यापुरता मर्यादित न ठेवता आरोग्य, शेती, शिक्षण, रोजगार आणि आपत्ती व्यवस्थापनातील समस्या सोडवण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संशोधकांनी पुढील तीन वर्षांसाठी ठोस उद्दिष्टे निश्चित करून प्रोटोटाइप, प्रायोगिक प्रकल्प आणि उपयुक्त उत्पादने विकसित करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT