पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील नऊ महिन्याच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील वास्तव्यानंतर मूळ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर पृथ्वीवर परत येत आहेत. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'NASA'ने दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स यांच्यासह इतर दोन क्रू-९ सदस्यांसह बुधवारी (दि.१८) पहाटे पृथ्वीवर उतरणार आहेत. स्पेसएक्स ड्रॅगन क्रू कॅप्सूल अंतराळयानाच्या यशस्वी लँडिगकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता यांना पत्र लिहित १४० कोटी भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्यावेळी संपूर्ण जग सुनीता विल्यम्सच्या सुरक्षित परतीची वाट पाहत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या या कन्येबद्दल चिंता व्यक्त केली. या संदर्भातील पत्र विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या एक्स सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "जरी तुम्ही हजारो मैल दूर असलात तरी, तुम्ही आमच्या हृदयाच्या जवळ आहात," असे म्हटले आहे. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नासाचे माजी अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांच्याकडून सुनीता यांच्यापर्यंत पोहचवले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना लिहिलेले पत्र हृदयस्पर्शी आहे. त्यांनी या पत्रातून १४० कोटी भारतीयांचा अभिमान प्रतिबिंबित करते, असे म्हणत मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात मॅसिमिनो यांना भेटले आणि विनंती केली की, त्यांचे आणि भारतातीयांचे हे पत्र सुनीता विल्यम्स यांच्यापर्यंत पोहोचवा. तिच्या शक्ती आणि सुरक्षित पुनरागमनाच्या शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी भारताच्या तिच्या गौरवशाली कन्येशी असलेल्या खोल नात्याला पुन्हा एकदा दुजोरा दिला. यावर सुनीता यांनी त्यांच्या या हावभावाने प्रभावित होऊन पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याचा प्रतिसाद माइक मॅसिमिनो यांच्याकडून मिळाल्याचा मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये विविध मान्यवरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यामध्ये नासाचे माजी, प्रतिष्ठित अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांची देखील पीएम मोदी यांनी भेट घेतली होती. यावेळी PM मोदी म्हणाले होते की, "माइक मॅसिमिनो यांना भेटून आनंद झाला. अंतराळाप्रति त्यांची आवड आणि तरुणांमध्ये ते लोकप्रिय करणे हे सर्वांनाच माहीत आहे. शिक्षण आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी ते करत असलेले काम देखील कौतुकास्पद आहे".