पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी (दि२२) झालेल्या हल्ल्यात २० हून अधिक जण पर्यटकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील २ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अतुल मोने आणि दिलीप डिसले अशी त्यांची नावे आहेत. या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध व्यक्त करत त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडले जाणार नाही, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या 'X' वरून ट्विटद्वारे म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. बाधित लोकांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडले जाणार नाही. त्यांना शिक्षा होईल. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादांविरूद्ध लढण्याचा आपला निर्धार अढळ असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.