नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ग्रेटर नोएडा येथे उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर, ‘भारत आता कोणावरही अवलंबून राहण्यास तयार नाही,’ असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. तसेच, व्यापारी आणि उत्पादकांना ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानात योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारत सरकारला लक्ष्य केले आहे. दंड म्हणून नवी दिल्लीवर अतिरिक्त 25 टक्के आयात शुल्क लावले आहे, ज्यामुळे अमेरिकेकडून भारतावर लादले जाणारे एकूण शुल्क 50 टक्क्यांवर पोहोचले आहे, जे जगातील सर्वाधिक दरांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, जागतिक अस्थिरतेमुळे देश विचलित होत नाही, तर देशाला नवी दिशा आणि नव्या संधी मिळतात. जागतिक अडथळे हे देशासाठी स्वबळावर उत्पादन करण्याची संधी आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी नवीन जीएसटी कपातीचे कौतुक केले आणि केंद्रातील भाजप सरकारच्या या निर्णयामुळे गरीब आणि मध्यम वर्गावरील कराचा बोजा कसा कमी झाला आहे, हे सांगितले. 2014 पूर्वी, काँग्रेस सरकारच्या काळात एक शर्ट कितीला मिळायचा याचे उदाहरणही त्यांनी दिले. सुधारणा ही एक निरंतर प्रक्रिया असून, 2017 मध्ये जीएसटी लागू करून अप्रत्यक्ष करप्रणालीत बदल आणले आणि या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यात आणखी सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.