Israel Iran Conflict PM Modi pudhari
राष्ट्रीय

Israel Iran Conflict PM Modi: इस्त्रायलच्या दौऱ्यावर असताना मोदींना इराण हल्ल्याची कल्पना होती... राजदूतांनी काय सांगितलं?

Anirudha Sankpal

Israel Iran Conflict PM Modi: इस्त्रायलने आमच्या अस्तित्वाला धोका असल्याचं सांगत इराणवर एअर स्ट्राईक केला होता. याला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे ज्यावेळी इस्त्रायल आणि अमेरिकेनं संयुक्तरित्या हे ऑपरेशन राबवलं त्याच्या काही दिवस आधीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचा दौरा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा इस्त्रायल दौरा होता.

यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करणार याची कल्पना होती का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता इस्त्रायलचे भारतातील राजदूत अझर यांनी उत्तर दिलं आहे. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इराणवरील स्ट्राईक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल अविव सोडल्यानंतरच कार्यान्वित करण्यात आला असल्याचं सांगितलं.

इस्त्रायलचे राजदूत अझर यांनी सांगितल्याप्रमाणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्त्रायलच्या दौऱ्यावर होते त्यावेळी या ऑपरेशनची माहिती कोणालाच नव्हती. अझर म्हणाले, 'ही एक ऑपरेशनल संधी होती ही संधी पंतप्रधान मोदींनी इस्त्रायल सोडल्यानंतरच समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्त्रायल दौऱ्यावेळी आम्ही या भागातील भूराजकीय घडामोडींवर चर्चा केली. मात्र आम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी आम्ही त्यांच्यासोबत शेअर केलेल्या नाहीत.'

अझर पुढे म्हणाले की, आम्ही इराणवर हल्ला करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इस्त्रायल दौरा झाल्यानंतर दोन दिवसांनी घेण्यात आला. यासाठी २८ फेब्रुवारी रोजी सुरक्षा कॅबिनेटची परवानगी घेण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या इस्त्रायल दौऱ्यावर होते. हा त्यांचा दुसरा इस्त्रायल दौरा होता. यापूर्वी त्यांनी २०१७ मध्ये इस्त्रायलचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर भारत - इस्त्रायल यांच्यातील द्विपक्षीय संबंध एका वेगळ्या उंचीवर पोहचले.

या दोन देशांनी विशेष रणनैतिक भागिदारी सुरू केली आहे. तसेच १७ विविध करार केले. २८ फेब्रुवारी रोजी युएस आणि इस्त्रायलने एक संयुक्त ऑपरेशन राबवत इराणवर हल्ला केला होता. यावेळी इराणमधील अनेक शहरांना टार्गेट करण्यात आलं. यात राजधानी तेहरानचा देखील समावेश होता. या कारवाईला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव देण्यात आलं. इराणने आपला अण्विक कार्यक्रम पुन्हा सुरू केल्यानं हा हल्ला केल्याचा इस्त्रायलनं दावा केला आहे. या लष्करी संघर्षात ७०० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे.

यानंतर इराणने देखील प्रत्युत्तर देत आखातामधील दुबई, अबू धाबी, कतार, बहरीन यासारख्या देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला. यामुळं आखाती देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांची ड्रोन हल्ल्यात हत्या करण्यात आल्यानंतर परिस्थिती अजूनच चिघळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT