पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Sahitya Sammelan 2025) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी निमंत्रण स्वीकारले आहे, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी आज (दि. २१) दिली.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन २१ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे स्थळ, स्वरूप, वेळ तसेच इतर रूपरेषा महामंडळ, संयोजक संस्था आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.
जेष्ठ नेते शरद पवार या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत. जवळपास ७० वर्षांनी पुन्हा एकदा दिल्ली मराठी साहित्य संमेलनासाठी सज्ज होणार आहे. दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात आहे.
यापूर्वी १९५४ साली विल्लीला ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही