PM Narendra Modi | डावे अन् काँग्रेसमुळे राज्ये उद्ध्वस्त! 
राष्ट्रीय

PM Narendra Modi | डावे अन् काँग्रेसमुळे राज्ये उद्ध्वस्त!

केरळमध्ये प्रचार प्रारंभ; भाजपच सत्तेत येणार असल्याचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

पलक्कड (केरळ); वृत्तसंस्था : काँग्रेस आणि डावे जिथे सत्तेत असतात तिथे राज्ये उद्ध्वस्त करतात, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी केरळमध्ये पलक्कड येथे सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. मोदींनी त्रिशूर येथे रोड शोदेखील केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, केरळमध्ये सध्या बदलाची लाट आहे. राज्यातील तरुण वर्ग एनडीए आणि विशेषतः भाजपच्या धोरणांकडे आकर्षित होत आहे. या वेळेस केरळमध्ये वेगळेच वातावरण आहे. बदलाचा संदेश स्पष्टपणे दिसत आहे. हा बदल केवळ राजकीय नाही, तर जनतेच्या आशा-अपेक्षांचा परिणाम आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे हा बदल शक्य होत आहे.

दरम्यान, राजकीय हिंसाचारात प्राण गमावलेल्या कार्यकर्त्यांना मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी केरळमधील प्रमुख आघाड्यांवर म्हणजेच लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ) आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, या दोन्ही आघाड्यांनी वर्षानुवर्षे सत्तेची अदलाबदल करून राज्याचा विकास रोखला. कम्युनिस्ट आणि काँग्रेस, केवळ मतदारसंघाच्या राजकारणात अडकले आहेत. राज्यात एनडीएचे सरकार आल्यास केरळचा वेगाने विकास केला जाईल. विकसित केरळ घडवणे ही आमची बांधिलकी आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना भाजपची ‘बी टीम’ म्हणत आहेत; पण जनतेने ओळखले आहे की, खरी पर्याय शक्ती भाजपचीच आहे.

मुंडू परिधान करून ‘चेंडा’ वाजवला

पलक्कड येथील सभेवेळी पंतप्रधान मोदींनी केरळची पारंपरिक मुंडू (धोती) परिधान करून स्थानिक संस्कृतीचा सन्मान केला. विशेष म्हणजे, सभेपूर्वी त्यांनी केरळमधील पारंपरिक ‘चेंडा’ ढोल वाजवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT