12 Years Of Narendra Modi | सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा नेहरूंचा विक्रम मोदी आज मोडणार 
राष्ट्रीय

12 Years Of Narendra Modi | सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा नेहरूंचा विक्रम मोदी आज मोडणार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मोडतील. निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदावर राहण्याचा मान नरेंद्र मोदी मिळवणार आहेत. १० जून रोजी, निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मोदींचा ४,३९९ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरूंचा कार्यकाळ ४,३९८ दिवसांचा होता. सरकारचा कार्यकाळ आणि पंतप्रधानपदाचे एक तप पूर्ण झाले आहे. या बारा वर्षांच्या कालखंडात मोदी सरकारने भारताची नवी ओळख निर्माण केली आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू १९५२ मध्ये पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांचा १९४७ ते १९५२ हा कार्यकाळ हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून होता. कारण त्यावेळी निवडणुकांची प्रक्रिया प्रस्थापित होऊन पार पडली नव्हती. यामुळे नेहरू यांचा हा काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून गणला जात नाही. २०२४ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरूंच्या एका ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी केली आहे. पंडित नेहरू १९५२, १९५७ आणि १९६२ अशा सलग तीन निवडणुका जिंकून पंतप्रधान झाले होते. तर मोदी २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सलग तीन निवडणुका जिंकणारे पंतप्रधान ठरले आहेत.

गतिमान भारत, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर!

रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीत क्रांती झाली आहे. २६ शहरांमध्ये १,१०० कि.मी.हून अधिक मेट्रोचे जाळे पसरले आहे. १६४ ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावत आहेत. अटल सेतू, सुदर्शन सेतू, चिनाब रेल्वे ब्रिज यांसारखे प्रकल्प भारताच्या ताकदीची साक्ष देत आहेत. विमानतळांची संख्या ७४ वरून थेट १६४ वर पोहोचली.

बळीराजाला बळ, मध्यमवर्गाला दिलासा

‘पीएम किसान सन्मान निधी’ अंतर्गत ४.३ लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. हमीभावावर २६ लाख कोटींची विक्रमी पीक खरेदी झाली, तर ४ कोटी शेतकऱ्यांना २ लाख कोटींचा पीक विमा मिळाला. मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठा दिलासा देत वर्षाला १२.७५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न ‘टॅक्स फ्री’ करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT