पुढारी ऑनलाईन डेस्क : गणेशोत्सव हा आपल्या देशासाठी केवळ श्रद्धेचा उत्सव नाही. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्यात या उत्सवाचा मोठा वाटा आहे, असे स्पष्ट करत आज समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्तेच्या भुकेल्यांना माझ्या गणेश पूजनामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी गणेश पूजेत सहभागी झालो म्हणून हे लोक संतप्त आहेत, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. ओडिशातील भूवनेश्वर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच गणेशोत्सव काळात सरन्यायाधीशांच्या घरी जावून गणेश दर्शन घेतले होते. यांच्या या भूमिकेवर काँग्रेससह विराधी पक्षांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. याला नरेंद्र मोदी यांनी आज सडेतोड प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात गणेशोत्सवाचा मोठा वाटा आहे. सत्तेची भूक असणारे इंग्रज देशाचे तुकडे पाडण्यात मग्न होते. जाती-जातीमध्ये देशात मतभेद निर्माण केले जात होते. समाजात विष कालवा, फूट पाडा आणि राज्य करा हे त्यांचे हत्यार बनले होते. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिक कार्यक्रमांतून भारताचा आत्मा जागवला होता. सर्व भेदभाव दूर करुन आपला धर्म आपल्याला संघटित व्हायला शिकवतो."
प्रधानमंत्री आवास योजना ही भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतिबिंब आहे. या योजनेंतर्गत लहान गावांतील मालमत्ता महिलांच्या नावावर होऊ लागल्या आहेत. आज देशातील 30 लाख कुटुंबांसाठी गृहप्रवेश करण्यात आला आहे. ज्या कुटुंबांना कायमस्वरूपी घर मिळाले आहे किंवा घर मिळण्याची खात्री आहे त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात होते. वंचित, गरीब, खेड्यापाड्यातील, दलित आणि आदिवासी समाजाच्या जीवनात होणारा बदल मला अधिक कष्ट करण्याची उर्जा देतो, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.
देश आज हैदराबाद मुक्ती दिवस साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या वेळी संधीसाधू सत्ता मिळवण्यासाठी भारताचे तुकडे करण्यास तयार होते. सरदार पटेल पुढे आले आणि देशाला एकत्र केले. हैदराबादमधील भारतविरोधी अतिरेकी शक्तींवर नियंत्रण ठेवले. 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्त केले. हैदराबाद मुक्ती दिवस ही केवळ एक तारीख नाही तर आपल्या देशाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांबाबत आपल्यासाठी एक प्रेरणा आहे.आपल्याला त्या आव्हानांकडेही लक्ष द्यावे लागे, असे आवाहनही त्यांनी केले.