नवी दिल्ली: मुंबईसह २९ महापालिकांचे निकाल लागले. यामध्ये बहुतांश ठिकाणी भाजपाने घवघवीत यश मिळवले. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास मराठीत पोस्ट करत महाराष्ट्राचे आभार मानतो, अशा भावना व्यक्त केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.
जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत. विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा, राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे. महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि सबंध महाराष्ट्राचे आभार.
महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार मानतो - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला मिळालेल्या प्रचंड विजयावरून असे दिसून येते की देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विकास धोरणावरच विश्वास आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे राज्यातील महायुती सरकारने केलेल्या विकास आणि लोककल्याणकारी कामांवर जनतेचा शिक्का आहे. या प्रचंड पाठिंब्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप-शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांचे या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन.