नवी दिल्ली ः भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर काही तासांतच बुधवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदींसह सर्व मंत्रिमंडळाने दहशतवादा - विरोधातील शौर्यासाठी भारतीय सैन्याचे भरभरू कौतुक केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांना ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली. त्यानंतर लगेचच संपूर्ण मंत्रिमंडळाने या कारवाईबद्दल सैन्याचे आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, सरकार दहशतवाद अजिबात सहन करणार नाही. दहशतवादाविरोधात अशी कारवाई होणे अपरिहार्य होते.
‘ऑपरेशन सिंदूर’ नियोजनानुसार सुरळीत पार पडावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी कमांडर्सच्या संपर्कात राहिले. त्यांची सर्व घडामोडींवर नजर होती, असे सूत्रांनी सांगितले. या अगोदर मंगळवारी रात्री एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी काहीतरी होणार याचे संकेतही दिले होते. भाषणाच्या शेवटी ते मलाही....म्हणून काही सेकंद थांबले आणि विषय बदलला होता. तो व्हिडीओही व्हायरल होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, केंद्र सरकारने 8 मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह वरिष्ठमंत्री सरकारचे प्रतिनिधित्व करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची स्वतंत्रपणे बैठक घेतली आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. पहलगाम हल्ल्यानंतर राजनाथ सिंह आणि अजित डोवाल यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांच्याकडून बैठकांचा सपाटा सुरूच आहे. ते सतत सैन्याच्या तयारीबद्दल, सुरक्षा व्यवस्थेबद्दल माहिती घेत आहेत.