पुढारी ऑनलाईन डेस्क: Pope Francis Death |कॅथलिक चर्चचे प्रमुख आणि ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे आज (दि. २१) वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. युरोपमधील व्हॉटिकन सिटीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी एक्स पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "पवित्र पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. या दुःखाच्या आणि आठवणीच्या क्षणी, जागतिक कॅथोलिक समाजाला माझ्या मनापासून संवेदना. जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी पोप फ्रान्सिस हे करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्य यांचे प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहतील.
लहान वयातच त्यांनी प्रभु येशू ख्रिस्तांच्या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी स्वतःला अर्पण केले. त्यांनी गरिबांसाठी, उपेक्षितांसाठी अपार सेवा केली. दुःखित आणि पीडित लोकांमध्ये त्यांनी आशेचा किरण जागवला.
माझ्या त्यांच्याशी झालेल्या भेटी मला नेहमीच प्रिय राहतील. सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या असलेल्या बांधिलकीने मला फार प्रेरणा दिली. भारतातील जनतेप्रती असलेले त्यांचे प्रेम सदैव सन्मानाने स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो".
पंतप्रधान मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची ३० ऑक्टोबर २०२१ रोजी व्हॅटिकन सिटीतील अपोस्टोलिक पॅलेसमध्ये भेट घेतली होती. यावेळी कोविड-१९ महामारी, हवामान बदल, गरिबी निर्मूलन आणि जागतिक शांतता यांसारख्या विविध विषयांवर पंतप्रधान माेदी यांनी पाेप यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली हाेती. या भेटीत मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले हाेते.
यानंतर इटलीतील अपुलिया येथे १४ जून २०२४ रोजी झालेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांची पुन्हा एकदा भेट झाली. यावेळीही मोदींनी पुन्हा एकदा पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले हाेते. मोदींनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर पोप फ्रान्सिस यांच्या लोकसेवेच्या आणि पृथ्वीच्या कल्याणासाठीच्या बांधिलकीचे कौतुक केले होते.
भारत आणि व्हॅटिकन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पोप फ्रान्सिस यांनी अनेकवेळा धर्मसहिष्णुता, गरिबांसाठी कार्य आणि मानवाधिकारांबाबत भारताचे कौतुक केले हाेते. पोप फ्रान्सिस यांनी भारत दौरा केला नाही. मात्र, त्यांनी भारत भेटीची इच्छा अनेकवेळा व्यक्त केली हाेती. २०१७ मध्ये त्यांची भारत भेट अपेक्षित होती; परंतु ती काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. पोप फ्रान्सिस यांनी २०१६ मध्ये मदर तेरेसा यांना 'संत' पद प्रदान केले. या सोहळ्यासाठी भारतातून अनेक प्रतिनिधी व्हॅटिकनमध्ये उपस्थित होते.