PM Modi security breach Pudhari
राष्ट्रीय

PM Modi security breach : पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमापूर्वी बोगस पीएमओ अधिकाऱ्यासह बंदूकधारी 'बॉडीगार्ड' ताब्यात

संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

PM Modi security breach :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत घुसखोरी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (NMACC) येथे आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणाहून संशयास्पदरित्या फिरणार्‍या दोघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

PMO वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत कार्यक्रमाच्या मुख्य परिसरात प्रवेश

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोहन पारेख (वय २४) असे ताब्यात घेण्यात आलेल्या मुख्य संशयिताचे नाव आहे. तो स्वतःला पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत कार्यक्रमाच्या मुख्य परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता.कार्यक्रमस्थळी तैनात असलेल्या कडक सुरक्षा व्यवस्थेदरम्यान सुरक्षा रक्षक व पोलिसांकडून उपस्थितांच्या ओळखपत्रांची कसून तपासणी सुरू होती. यावेळी रोहन याने स्वतःचे PMO कार्यालयाचे ओळखपत्र दाखवले. मात्र, सुरक्षा यंत्रणांना त्याच्या हालचालींवर आणि ओळखपत्रावर संशय आल्याने त्यांनी कसून तपासणी केली असता ते ओळखपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

खासगी बॉडीगार्डकडे आढळली बंदूक

विशेष म्हणजे, रोहन पारेख याच्यासोबत एक खासगी बॉडीगार्ड देखील होता. पोलिसांनी त्यालाही रोखून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक बंदूक आढळल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय आणि बनावट ओळखीच्या आधारे थेट पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.

क्राईम ब्रँचकडून सखोल तपास सुरु

सुरक्षेत गंभीर बिघाड निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आता मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. हा तरुण नेमक्या कोणत्या हेतूने तिथे आला होता, त्याला बनावट ओळखपत्र कोणी बनवून दिले, तसेच यामागे काही मोठे कारस्थान आहे का, या दिशेने क्राईम ब्रँचचे पथक सध्या सखोल चौकशी करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT