पंतप्रधान नरेंद्र मोदी File Photo
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 3 परम रुद्र महा संगणकांचे लोकार्पण!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी १३० कोटी रुपयांच्या तीन परम रुद्र महा संगणकांचे लोकार्पण केले.हे महा संगणक पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महा संगणकीय प्रणाली अंतर्गत वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी हे महत्वाचे पाऊल आहे. हे तिन्ही महा संगणक स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आले आहेत. अनेक वैज्ञानिक विषयांमध्ये अत्याधुनिक संशोधनासाठी या संगणकांचा वापर होणार आहे.

दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, परम रुद्र महा संगणक, भारत संगणकीय क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. संगणकीय क्रांतीत आपल्या देशाचे योगदान बिट, बाइट्समध्ये नसून टेराबाइट्स आणि पेटाबाईट्समध्ये असले पाहिजे. त्यामुळे आपण योग्य दिशेने योग्य गतीने वाटचाल करत आहोत, हे या यशामुळे सिद्ध होते. यंदाच्या अर्थसंकल्पात संशोधन निधीसाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारताने वैज्ञानिक शोधात जागतिक स्तरावर आघाडी घेतली पाहिजे. अंतराळ क्षेत्र हे याचे प्रमुख उदाहरण आहे, जिथे भारत एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप येथे ठेवण्यात आलेला महा संगणक फास्ट रेडिओ बर्स्टसारख्या खगोलीय घटनांच्या संशोधनासाठी वापरला जाणार आहे. दिल्लीतील महा संगणक इंटर-युनिव्हर्सिटी एक्सीलरेटर सेंटर मध्ये ठेवण्यात आला आहे. याचा वापर मटेरियल सायन्स आणि न्यूक्लियर फिजिक्समध्ये संशोधन वाढवण्यासाठी होईल. कोलकाता येथील एस एन बोस केंद्रातील महा संगणकाचा वापर भौतिकशास्त्र, विश्वविज्ञान आणि पृथ्वी विज्ञान यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT