पुढारी ऑनलाईन डेस्क : Pariksha Pe Charcha 2025 Live Updates | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बोर्डाच्या परीक्षांपूर्वी देशभरातील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमातून संवाद साधत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून 'परीक्षा पे चर्चा' हा उपक्रम केंद्र सरकारकडून राबवला जात आहे. 'परीक्षा पे चर्चा 2025' या कार्यक्रमात पीएम मोदींनी निसर्गाच्या सानिध्यात देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांशी खुलेपणाने संवाद साधला. ते विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटेवरील महत्त्वाच्या परीक्षेमधील अभ्यास प्रक्रिया, अडचणी, ताणतणाव व्यवस्थापन आणि यश या संदर्भात मार्गदर्शन केले.
परीक्षेवरील चर्चेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान मोदींनी सुंदर नर्सरीमध्ये एक वृक्षारोपणही केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ज्याप्रमाणे ही झाडे लावली आहेत, त्यांना पाणी देण्यासाठी काय उपाय आहे. ते पुढे म्हणाले की, झाडाशेजारी मातीचे भांडे ठेवावे आणि महिन्यातून एकदा त्यात पाणी घालावे. यामुळे कमी पाण्यातही झाड वाढण्यास मदत होईल. यानंतर पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना सवाल केला की संवादात कार्यक्रमातील तुमच्या आठवणीत काय राहिल. तेव्हा एका विद्यार्थ्याने "तुमच्या सोबत केलेले वृक्षारोपण लक्षात राहील, ते आम्हाला अभ्यास करताना देखील प्रेरणा देईल, असे म्हटले आहे".
जगातील बहुतेक भागात झालेल्या विकासामुळे ग्राहकवादी संस्कृती निर्माण झाली. हे सर्व माझे आहे, मला ते माझ्या आनंदासाठी वापरायचे आहे. जर मला चांगले फर्निचर हवे असेल तर मी दोनशे वर्षे जुने झाड तोडून टाकेन. यामुळे निसर्गाचा सर्वाधिक नाश झाला. आपली संस्कृती निसर्गाचे शोषण करण्याची नाही. आपली जीवनशैली अशी असावी की ती निसर्गाचे रक्षण करेल आणि निसर्गाचे पोषण करेल.
अपयशामुळे आयुष्य थांबत नाही. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर केवळ परीक्षेत नाही तर जीवनात यशस्वी व्हा. जीवनात यशस्वी होण्याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या अपयशांना तुमचे शिक्षक बनवणे. जीवन म्हणजे फक्त परीक्षा नाही, तर जीवनाकडे संपूर्णपणे पाहिले पाहिजे. क्रिकेटपटू त्यांच्या चुका लक्षात येण्यासाठी त्यांचे सामने पाहतात. स्वतःला वेगळे करू नका. स्वतःला प्रेरित करण्यासाठी इतरांची मदत घ्या. कुटुंबातील सदस्यांशी किंवा वरिष्ठांशी संपर्क साधा आणि मदत मिळवा. स्वतःला आव्हान द्या आणि ध्येय निश्चित करा. ते ध्येय साध्य केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.
तंत्रज्ञानाला तुमची ताकद बनवण्यासाठी त्याचा सुज्ञपणे वापर करा. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, कारण ते कल्याणासाठी तयार केले आहे. कोणत्याही कामात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी, कालपेक्षा चांगले होण्याचा प्रयत्न करा.
पालकांनी आपल्या पाल्यावर कोणतीही गोष्ट लादली नाही पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्याला ओळखायला शिकावे. आपल्या पाल्याला कशात आवड आहे?. त्याचे मन कशात रमते, त्याला स्वत:साठी ओळखण्यास कुटुंबाने मदत केली पाहिजे. पालक आणि परिवाराला माझी विनंती आहे की, "मी पालकांना आणि कुटुंबातील सदस्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मुलांना समजून घेण्याचा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या इच्छा आणि क्षमता समजून घ्या. त्याच्या क्षमतेनुसार त्याचे निरीक्षण करा आणि शक्य असल्यास त्याला मदत करा. याशिवाय शाळेतील शिक्षकांनादेखील पीएम मोदींनी विनंती केली की, "विद्यार्थ्यांमध्ये तुलना करू नका. विद्यार्थ्यांमधील कमतरता त्यांना एकांतात सांगा तसेच त्यांच्या सकारात्मक बाबीदेखील दाखवून द्या", असेही सांगितले.
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, "पुरेशी झोप मिळते की नाही याचा संबंध पोषणाशी आहे. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी झोप खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला किती तास झोपण्याची आवश्यकता आहे? हे महत्वाचे आहे. याशिवाय, पंतप्रधान म्हणाले की तुमच्यापैकी किती जणांनी झाडाखाली उभे राहून दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनात कोणतीही प्रगती करण्यासाठी पोषण अत्यंत महत्वाचे आहे.
नेतृत्वाचा मंत्र देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "नेतृत्व लादले जाऊ शकत नाही. तुमच्या वागण्यावरून लोक तुम्हाला नेता म्हणून स्वीकारतात. जर तुम्ही तुमचे विचार लोकांवर लादले तर ते योग्य ठरणार नाही. जेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात तेव्हा ते तुमचे नेतृत्व ओळखतात.
अनेक विद्यार्थ्यांना वारंवार प्रयत्न करून एखाद्या क्षेत्रात यश मिळत नाहीत, यावर बोलतान PM म्हणाले, तुम्ही तुमच्यातील वेगळेपणे शोधले पाहिजे. जे काम करताना तुम्हाला आनंद मिळतो. ते काम तुम्ही केले पाहिजे. आणि त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक विशेष प्रतिभा असते. अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इतर काही लपलेली प्रतिभा असण्याची शक्यता आहे. शिक्षकांनी ती प्रतिभा ओळखून तिला प्रोत्साहन दिले पाहिजे.
परिक्षेतील ताणतणाव विरोधी लढण्यासाठी स्वत:लाच स्वत: तयार करायला पाहिजे. प्रेशरला मनावर न घेता, आपले लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रीत पाहिजे, असे पीएम मोदी म्हणाले. ही गोष्ट पटवून देण्यासाठी मोदींनी आपण क्रिकेटमधून शिकले पाहिजे, असे म्हटले. यावेळी ते म्हणाले, "जेव्हा एखादा फलंदाज मैदानावर उभा राहतो तेव्हा लोक पॅव्हेलियनमधून ओरडतात. कोणी ४ धावा म्हणते, कोणी षटकार मारण्याची मागणी करतात, कोणी दुसरे काहीतरी म्हणतात. पण जर फलंदाज त्यांच्या बोलण्याने दबावात येऊ लागला तर तो कामगिरी करू शकणार नाही. तो सर्वांचे ऐकतो, पण स्वतःच्या मनाप्रमाणे फलंदाजी करतो. तुम्हीही सर्वांच्या बोलण्याचा भार तुमच्या मनावर लादू नका. सर्वांचे ऐका, पण जे सर्वोत्तम करता येईल ते करा.'
परिक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने सूर्यस्नान करण्याची सवय लावावी. सकाळी लवकर उन्हात जाऊन बसा. एका दाट झाडाखाली उभे राहा आणि एक दीर्घ श्वास घ्या तुमच्या शरीराचा जास्तीत जास्त भाग सूर्यप्रकाशात आणण्याचा प्रयत्न करा. याशिवाय, शारीरिक पोषणाचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, 'गहू, बाजरी, तांदूळ, सर्वकाही खा. बाजरी खाण्यावर लक्ष केंद्रित करा.
पीएम मोदींचा 'परीक्षा पे चर्चा' हा संवाद कार्यक्रम नवीन स्वरूपात आणि शैलीत आयोजित केला जात आहे. यावर्षी 'परीक्षा पे चर्चा'मध्ये पीएम मोदींसह, अध्यात्मिक गुरू सद्गुरु, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), बॉक्सर मेरी कोम, अवनी लेखारा, रुजुता दिवेकर, सोनाली सभरवाल, फूडफार्मर विक्रांत मेस्सी, भूमी पेडणेकर, टेक्निकल गुरुजी आणि राधिका गुप्ता आदी विविध क्षेत्रातील दिग्गज सहभागी होत आहेत.