चंदीगड : "जेव्हा आमची क्षेपणास्त्रे लक्ष्यावर पोहोचतात, तेव्हा शत्रुचा थरकाप उडतो. जेव्हा आमचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे लक्ष्यांवर हल्ला करतात तेव्हा शत्रूंना 'भारत माता की जय'चा आवाज ऐकू येते". जेव्हा भारतीय भारत माता की जय... म्हणतात, तेव्हा दुश्मनदेखील कापतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्याला संबोधित करताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१३) पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळील आदमपूर (पंजाब) एअरबेसला भेट दिली आणि तेथील सैनिकांशी संवाद साधला.
दहशतवादाविरोधात राबवण्यात आलेले 'ऑपरेशन सिंदूर'चे शौर्य जगभरात पोहचलं. जगाने भारतीय एअर फोर्सची ताकद पाहिली आहे. भारतीय जवानांनी इतिहास रचला आहे. तुम्ही सर्वांनी कोटी कोटी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. सैन्याचे कार्य नवीन पीढीसाठी प्रेरणादायी आहे. सैन्याने न्यूक्लिअर धमक्यांची हवाच काढून टाकली, असेही पीएम मोदी म्हणाले.
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मी अभिमानाने सांगू शकतो की तुम्ही सर्वांनी तुमचे लक्ष्य परिपूर्णतेने गाठले आहे. पाकिस्तानमध्ये केवळ दहशतवादी तळ आणि त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त झाले नाहीत तर त्यांच्या नापाक योजना आणि धाडसाचाही पराभव झाला."
पीएम मोदी पुढे म्हणाले, दहशतवादी लपून भारतात आले, तुम्ही त्यांना मातीत गाडलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून मारलं. ज्या पाकिस्तानी सैन्यावर हे दहशतवादी अवलंबून होते, त्यांना भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने धूळ चारली आहे. तुम्ही पाकिस्तानी सैन्याला असेही सांगितले आहे की, पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे दहशतवादी बसून शांततेत श्वास घेऊ शकतील. आम्ही घरात घुसून तुमच्यावर हल्ला करू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही. आपल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा विचार करून पाकिस्तान बरेच दिवस झोपू शकणार नाही, असे म्हणत भारताकडे डोळे वटारून बघाल तर खात्माच होणार असा स्पष्ट इशारा मोदींनी पाकिस्तानला दिला आहे.
दहशतवादी भित्र्यासारखे लपून आले, पण ते विसरले की आपण ज्यांना आव्हान दिले होते ते भारतीय सैन्य होते. तुम्ही त्यांना समोरून हल्ला करून मारले. तुम्ही दहशतवादाचे सर्व प्रमुख अड्डे उद्ध्वस्त केले. ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले, १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारतात निष्पाप लोकांचे रक्त सांडण्याचा भारताकडे डोळे वटारून बघण्याचा आता एकच परिणाम होईल, तो म्हणजे केवळ... "विनाश आणि सामूहिक संहार". "आतंकवाद्यांच्या आकांना आता समजले आहे की भारताकडे वाईट नजरेने पाहण्याचा एकच परिणाम होईल, विनाश आणि महाविनाश", असेही पीएम मोदी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर ही सामान्य सैन्य कारवाई नाही. तर हे भारताच्या धोरणाचे, हेतूंचे आणि निर्णय क्षमतेचा संगम आहे- पीएम मोदी