पुढारी ऑनलाईन डेस्क: Marathi Sahitya Sammelan |पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.२१) दिल्लीमध्ये ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. तारा भवाळकर या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत. ७१ वर्षांनंतर दिल्लीत तीन दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या हस्ते दिल्लीत शुक्रवारी (दि.२१) दुपारी विज्ञान भवन येथे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. शुक्रवार २१ ते रविवार २३ फेब्रुवारी दरम्यान हे साहित्य संमेलन दिल्लीत चालणार आहे. साहित्य संमेलनाला स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे आहेत. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीराम पवार आणि साहित्यिक यांचीदेखील उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहे.
दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संमेलनात विविध पॅनेलद्वारे चर्चा, पुस्तक प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसिद्ध साहित्यिकांसह संवादात्मक सत्रांचे आयोजन केले आहे. हे संमेलन मराठी साहित्याची कालातीत प्रासंगिकता साजरी करेल आणि समकालीन चर्चासत्रात त्याची भूमिका सादर करेल. ज्यामध्ये भाषा जतन, अनुवाद आणि साहित्यकृतींवर डिजिटलायझेशनचा प्रभाव या विषयांचा समावेश असेल.
७१ वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनात पुणे ते दिल्ली असा प्रतिकात्मक साहित्यिक रेल्वे प्रवास आकर्षण असेल, असे 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो'ने म्हटले आहे. ज्यामध्ये १,२०० सहभागी साहित्याच्या एकात्मिक भावनेचे प्रदर्शन करतील. यात २,६०० हून अधिक कविता सादरीकरणे, ५० पुस्तकांचे प्रकाशन आणि १०० बुक स्टॉल्स असतील. देशभरातील प्रतिष्ठित विद्वान, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी सहभागी होतील, असेही 'PIB'ने म्हटले आहे.