बंगळूर : पिंक मेट्रोला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. शेजारी राज्यपाल डॉ. सुधा यादव, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, बंगळूर विकासमंत्री कृष्ण ब्यायरेगौडा, खासदार तेजस्वी सूर्या आदी. 
राष्ट्रीय

PM Modi inaugurates Namma Metro Pink Line - देशात 'चिप'पासून 'शिप' पर्यंत उत्पादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी : नम्म मेट्रोच्या पिंक लाईनचे उ‌द्घाटन; विकासाबाबत भेदभाव नाही

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

बंगळूर शहर भारताची सिलिकॉन व्हॅली असून, देशाच्या आर्थिक विकासात ते मुख्य इंजिनप्रमाणे काम करत आहे. कर्नाटकच्या विकासाचा प्रवास हा 'विकसित भारता'च्या उद्दिष्टाला पूरक आहे. 'चिप'पासून 'शिप'पर्यंत भारतातच उत्पादन वाढत आहे. कर्नाटकच्या विकासाच्या बाबतीत केंद्र सरकारने कोणताही भेदभाव केलेला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

बंगळूरमधील बिळेकहळ्ळीतील आयआयएम सभागृहात शुक्रवारी (दि. १३) आयोजित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि कोनशिला उभारणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदी बोलत होते. बंगळूर मेट्रो नेटवर्कच्या विस्ताराचा विशेष उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, २०१४ मध्ये नम्म मेट्रो नेटवर्क केवळ १७ कि.मी. होते. आता ते १०० कि.मी.च्या पार गेले आहे. आपण शतक पूर्ण करत आहोत.

मुख्यमंत्री शिवकुमारजी, याची नोंद घ्या. मेट्रो नेटवर्कच्या विस्तारासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. मेट्रोसेवेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना मोठा फायदा होईल. बंगळूरमध्ये मोठ्या संख्येने कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रे कार्यरत असणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात भाषणाची सुरुवात

करताना पंतप्रधान मोदी यांनी, बंगळूरमधील माझ्या भगिनी आणि बांधवांना नमस्कार, अशा शब्दांत कन्नड भाषेतून शुभेच्छा दिल्या. अक्कम्मा देवी आणि केम्पेगौडा यांना नमन करून त्यांनी दिवंगत अनंतकुमार यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पिंक लाईन मेट्रोच्या लोकार्पणाने अनंतकुमार यांच्या आत्म्याला आनंद झाला असेल, असे त्यांनी सांगितले.

शिवकुमार यांच्यासह हिरवा कंदील

विकास प्रकल्पांच्या श्रेयवादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वाद सुरू आहे. मात्र, मेट्रो उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील जवळीक पाहावयास मिळाली.

पिंक लाईन मार्गाला हिरवा झेंडा दाखवताना, पंतप्रधान मोदी यांनी अंतरावर उभे असलेले मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना जवळ बोलावले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हात हातात धरून दोघांनी मिळून हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः तिकीट खरेदी केले आणि मुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासह नवीन पिंक लाईन मेट्रो ट्रेनमधून प्रवास केला. त्यांनी ट्रेनमधील सहप्रवाशांशीही संवाद साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT