नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
'आज भारत अशा स्थितीत आहे की जो रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतो. भारताकडे असे पंतप्रधान आहेत जे व्होलोदिमिर झेलेन्स्की आणि व्लादिमीर पुतिन दोघांनाही आलिंगन देऊ शकतात. भारताला रशिया आणि युक्रेन या दोन्ही ठिकाणी स्वीकारले जाते,' अशा शब्दात काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मोदी सरकारचे कौतुक केले.
शशी थरूर रायसीना डायलॉगमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे भरभरून कौतुक केले. थरूर यांच्या या वक्तव्याची चर्चा राष्ट्रीय राजधानीत चांगलीच आहे. थरूर यांच्या या विधानाबाबत बोलताना भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, थरूर सत्य बोलले आहे. मात्र यामुळे राहुल गांधी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे म्हणत टोला लगावला. दरम्यान, थरूर यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारले असता ते म्हणाले की माझी टिप्पणी सर्व काही सांगते. त्यात आणखी नवीन काहीही जोडण्याची गरज नाही.
गेले काही दिवस शशी थरूर यांची वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या सोबत शशी थरूर यांनी सेल्फी काढला होता. तेव्हाही त्या फोटोची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेत त्यांचे कौतुक केले. त्यामुळे शशी थरूर यांच्या मनात नक्की काय चालले आहे, याबाबत अनेक कयास बांधले जात आहेत.