दिब्रुगड : आसाममधील बिस्वनाथ येथे चहाच्या मळ्यात महिला कामगारांसोबत चहाची पाने तोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.  (पीटीआय फोटो)
राष्ट्रीय

PM Narendra Modi | काँग्रेसच्या राजकुमाराची पराभवाची सेंच्युरी होणार

पंतप्रधान मोदींची टीका : आसाममध्ये भाजपची हॅट्ट्रिक निश्चित

पुढारी वृत्तसेवा

गुवाहाटी; वृत्तसंस्था : आसाममध्ये यावेळी भाजपची विजयाची हॅटट्रिक निश्चित आहे; तर काँग्रेसच्या राजकुमाराच्या पराभवाची सेंच्युरी होणार आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. आसाममधील गोगामुख आणि बिस्वनाथ येथे त्यांच्या निवडणूक प्रचार सभा झाल्या.

भाजपच्या 10 वर्षांच्या कारभाराचे कौतुक करत मोदी म्हणाले की, गेल्या दशकात आसाममध्ये ‘सेवा’ आणि ‘सुशासन’ यांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 22 लाखांहून अधिक गरीब कुटुंबांना पक्की घरे देण्यात आली आहेत. आगामी काळात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करून आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल. सभेतील मोठ्या गर्दीकडे निर्देश करत मोदी म्हणाले, युवकांचा उत्साह, महिलांचे आशीर्वाद आणि लोकांचे प्रेम हेच सांगत आहे की, यावेळी विजयाची हॅट्ट्रिक पक्की आहे. तुमच्या आशीर्वादामुळे मला पंतप्रधान म्हणून तिसर्‍यांदा संधी मिळाली आणि आता आसाममध्येही भाजप सरकार तिसर्‍यांदा येणार आहे.

राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले, काँग्रेसच्या स्वयंघोषित राजकुमाराच्या पराभवाची सेंच्युरी लागणार आहे. काँग्रेसने सत्तेसाठी समाजात फूट पाडली. ब्रह्मपुत्रा नदीवर 60 ते 65 वर्षांत फक्त 3 पूल बांधले. घराणेशाहीला प्राधान्य दिले. दिल्लीत एक कुटुंब आहे आणि आसाममध्येही एक कुटुंब आहे. काँग्रेससाठी फक्त त्यांचाच फायदा महत्त्वाचा आहे.

काँग्रेसने गेंड्यांनाही सोडले नाही

काँग्रेसने येथील एकशिंग गेंड्यांनाही सोडले नाही. अभयारण्यातील परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. गेंड्यासाठी असलेली जमीन काँग्रेसने स्वतःच्या मतपेटीला दिली. त्याचा परिणाम तुमच्या रोजीरोटीवर झाला. तुम्ही भाजपला निवडून दिल्यावर आम्ही अवैध ताबा हटवला. आता पुन्हा येथील अभयारण्यात गेंडे दिसून येत आहेत. काँग्रेस आसाममध्ये परदेशींना वसवू इच्छिते आणि स्थानिकांना अल्पसंख्य बनवू पाहते. भाजप-एनडीए सरकार शेतकरी, आदिवासी आणि जंगलातील जमीन घुसखोरांच्या ताब्यात राहू देणार नाही.

आसाम चहासह चिपसाठीही ओळखला जाईल...

मोदी म्हणाले, चहाचे मळे हीच बिस्वनाथची ओळख आहे. येथील चहा मळे ही आमची शान आहे. या चहाच्या मळ्यांचा मोह माझ्यासारख्या चहावाल्याला नाही होणार तर कोणाला होईल. चहाच्या मळ्यात काम करणार्‍या माता-भगिनींचे आशीर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात केली. एकेकाळी आसामची ओळख फक्त चहासाठी होती. आता जग आसामला चहा आणि चिप या दोन्हीसाठी ओळखेल. सेमीकंडक्टर उत्पादनाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, भविष्यात मोबाईल, गाड्या, टीव्ही, फ्रिज यांसारखी उत्पादने आसाममध्ये तयार होणार्‍या चिपवर चालतील. हे विकसित आसामचे आमचे व्हिजन आहे.

ब्रह्मपुत्राखालून बोगदा...

मोदी म्हणाले, आसामच्या हायवेवर आता लढाऊ विमान उतरते. येथे ब्रह्मपुत्रेच्या पाण्याखालूनही वाहने धावतील. केंद्र सरकारने 18,500 कोटी खर्चून अंडरवॉटर बोगदा बनविण्याचा निर्णय घेतला आहे. या सभेला जितके लोक आहेत, काँग्रेसला इतकी गर्दी जमा करता आली असती का?

मोदी चहाच्या बागेत

पंतप्रधान मोदी चहाच्या मळ्यातही गेले. तिथे त्यांनी चहापत्ती खुडणार्‍या महिला कामगारांसोबत संवाद साधत स्वतःही चहाची पाने खुडून महिलांकडे दिली. एका महिलेला मोदी म्हणाले, तुम्ही मला हे शिकवले. आजपासून तुम्ही माझ्या गुरू. एका कामगार महिलेने सेल्फी घेतला. यावेळी मोदींनी या महिलांनी गायिलेली पारंपरिक गाणी ऐकली आणि टाळ्या वाजवून त्याबद्दल त्यांची स्तुतीही केली. भाजपने मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT