नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विज्ञान भवनात उद्योजकांशी संवाद साधला. 
राष्ट्रीय

PM Narendra Modi | आगामी दोन वर्षांत ३.५ कोटी रोजगार तयार करण्याचे लक्ष्य

पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन : २४०० कोटींच्या प्रोत्साहन निधीचे वितरण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेंंतर्गत येत्या दोन वर्षांत साडेतीन कोटी नवे रोजगार तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, सरकार त्या दिशेने जोमदार प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेंंतर्गत संपूर्ण देशातील सुमारे १५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना २४०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन रकमेचे वाटप केले.

ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे खात्यांमध्ये पाठवण्यात आली. येथील विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी तरुण आणि त्यांना नोकऱ्या देणाऱ्या उद्योजकांशी संवादही साधला. पंतप्रधान म्हणाले, ही योजना पहिल्यांदा नोकरी शोधणाऱ्या तरुण आणि उद्योगांदरम्यान एक पूल म्हणून काम करते. याद्वारे आपण भविष्यासाठी एक मजबूत कार्यशक्ती तयार करत आहोत. प्रोत्साहन रक्कम हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम देशभरातील दोनशे औद्योगिक शहरांत पार पडला. या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रेही वाटण्यात आली. याचे कारण म्हणजे नवीन कामगार संहितेनुसार नियुक्ती पत्र देणे अनिवार्य आहे.

योजनेसाठी ९९,४४६ कोटींची तरतूद

पंतप्रधान मोदी यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत सरकारने एकूण ९९,४४६ कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. त्यानुसार येत्या दोन वर्षांत साडेतीन कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेची वैशिष्ट्ये

* पहिली वेळ नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १५,००० रुपयांपर्यंत दिले जातात.

* नियोक्त्यांनाही या योजनेंतर्गत प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यासाठी दरमहा ३,००० रुपयांपर्यंत मिळतात.

* रोजगाराला चालना देण्यासाठी चार वर्षांपर्यंत अतिरिक्त लाभ दिले जात आहेत.

* ऑगस्ट २०२५ पासून, पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना औपचारिक कार्यबलात समाविष्ट केले आहे. यात ३० टक्के महिलांचा समावेश.

* या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या ८० टक्क्यांहून अधिक संस्था लहान उद्योग असून, तेथील कर्मचाऱ्यांची संख्या २५ पेक्षा कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT