गुवाहाटी; वृत्तसंस्था : काँग्रेसने व्होटबँक तयार करण्यासाठी बेकायदेशीर बांगला देशी स्थलांतरितांना जाणीवपूर्वक आसाममध्ये आश्रय दिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
दिब्रुगडमध्ये 10,601 कोटी रुपयांच्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी आसामची ओळख, जमीन आणि आकांक्षांना सातत्याने पायदळी तुडवले आहे. भाजपचे ‘डबल इंजिन सरकार’ मागील राजवटींनी केलेल्या दशकांच्या नुकसानीची भरपाई करत आहे. काँग्रेसला आसामच्या आणि इथल्या लोकांच्या ओळखीची कोणतीही पर्वा नाही. त्यांना फक्त सत्तेत रस आहे, काँग्रेसने बेकायदेशीर बांगला देशी स्थलांतरितांना स्थानिकांच्या वर प्राधान्य दिले. मतदार यादीतील त्रुटी सुधारण्याच्या प्रक्रियेला काँग्रेस विरोध करत आहे. कारण, त्यांना त्यांची व्होटबँक वाचवायची आहे.
जमीन आणि जंगलांवर अतिक्रमण: काँग्रेस आजही आसामची जमीन आणि वनक्षेत्रांवर स्थलांतरितांना वसवून आपली व्होटबँक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. “तुमचा विनाश झाला तरी त्यांना पर्वा नाही, त्यांना फक्त त्यांची व्होटबँक मजबूत करायची आहे,” असा इशारा त्यांनी जनतेला दिला. काँग्रेस आजही देशविरोधी विचारधारेला पुढे नेत आहे. या लोकांना आसाममधील जंगले आणि जमिनीवर बांगला देशी घुसखोरांना वसवायचे आहे. त्यांना फक्त आपली व्होटबँक मजबूत करायची आहे, त्यांना तुमची कोणतीही पर्वा नाही. काँग्रेसला तुमच्या ओळखीशी काहीही देणेघेणे नाही.
अवैध घुसखोरांना काँग्रेसनेच वसवले आणि काँग्रेसच त्यांचे रक्षण करत आहे. म्हणूनच काँग्रेस पक्ष मतदार यादीच्या शुद्धीकरणाला विरोध करत आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की, आसामची ओळख आणि आसामच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी भाजप पोलाद बनून तुमच्या पाठीशी उभी आहे. लांगूलचालन आणि व्होटबँकेच्या या काँग्रेसी विषापासून आपल्याला आसामला वाचवायचे आहे.
चहावाला आणि चहामळे कामगार : चहामळे समुदायाच्या ऐतिहासिक उपेक्षेबद्दल काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, दशकानुदशके सत्ता असूनही काँग्रेसने कामगारांना जमिनीचे हक्क दिले नाहीत. आमच्या सरकारने चहामळे समुदायाला जमिनीचे हक्क आणि सन्मान दिला. मी एक चहावाला आहे. जर मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो नाही, तर कोण उभे राहणार?, असे मोदी म्हणाले.