नवी दिल्ली : जगात सध्या युद्ध आणि अशांततेच्या चर्चा सुरू असताना भारतात सांस्कृतिक संबंध आणि सभ्यताविषयक संवादावर विचारमंथन होत आहे. जागतिक शांततेसाठी सांस्कृतिक जोडणी ही सर्वांत मजबूत हमी ठरू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. नवी दिल्लीतील पुराना किल्ला येथे आयोजित पहिल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सभ्यता संवाद मंचाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. एससीओच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मंचातून सदस्य देशांमधील सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक सहकार्यामुळे देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी सिंधू संस्कृती आणि मेसोपोटेमिया यांच्यातील सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या व्यापारी संबंधांचा दाखला दिला. प्राचीन व्यापारी मार्गांमधून व्यापाऱ्यांसोबत विद्वान, प्रवासी आणि बौद्ध भिक्षूंचीही ये-जा होत असे. यातून विचार, भाषा आणि परंपरांची देवाणघेवाण झाली. गांधार आणि मध्य आशियातून बौद्ध विचार चीनपर्यंत पोहोचले, तर फाह्यान, ह्युएन त्सांग आणि इत्सिंग यांसारखे चिनी विद्वान भारतात आले, असे त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक पर्यटनाला चालना द्या
सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यासाठी प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, विविध भाषांमध्ये अनुवाद, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, संयुक्त संशोधन प्रकल्प आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याचे आवाहन मोदी यांनी केले. संग्रहालये, ग्रंथालये आणि सांस्कृतिक संस्थांनी संयुक्त प्रदर्शने आयोजित करावीत, तसेच विद्यापीठांमधील संशोधक आणि कलाकारांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
पंचतंत्र कथा अरबी, पर्शियन भाषेत लोकप्रिय
भारताच्या पंचतंत्रातील कथा पर्शियन आणि अरबी भाषांमध्ये पोहोचून ‘कलीला व दिमना’ या स्वरूपात लोकप्रिय झाल्या. रामायणाने आग्नेय आशियातील संस्कृतीवरही प्रभाव टाकला. कंबोडियातील ‘रीमकेर’ हे त्याचे उदाहरण असल्याचे मोदी म्हणाले. गणित, स्थापत्यकला, संगीत आणि उद्यानरचनेच्या क्षेत्रांतही भारत आणि मध्य आशियामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण झाल्याचे त्यांनी नमूद केले.