PM Modi 75th Birthday File photo
राष्ट्रीय

PM Modi 75th Birthday: PM मोदी आज मध्य प्रदेशात साजरा करणार ७५ वा वाढदिवस; लाडक्या बहिणींसाठी करणार मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.17) आपला 75 वा वाढदिवस मध्य प्रदेशात साजरा करणार आहेत.

मोहन कारंडे

PM Modi 75th Birthday

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.17) आपला 75 वा वाढदिवस मध्य प्रदेशात साजरा करणार आहेत. हा क्षण खास ठरणार आहे कारण मोदी दुसऱ्यांदा मध्य प्रदेशाच्या भूमीवर वाढदिवस साजरा करत आहेत. याआधी 2022 मध्ये 72 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी कूनो नॅशनल पार्कमध्ये चिते सोडून 'प्रोजेक्ट चीता'चा शुभारंभ केला होता.

या वेळी पंतप्रधान मोदी धार जिल्ह्यातील भैंसोला गावात आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. येथे ते देशाचा पहिला पीएम मित्र टेक्सटाईल पार्क, ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार आणि पोषण अभियान’, तसेच आदि सेवा पर्व यांसह अनेक महत्वाच्या योजना देशाला समर्पित करणार आहेत. यावेळी राज्यपाल मंगुभाई पटेल आणि मुख्यमंत्री मोहन यादवही उपस्थित राहतील.

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार आणि पोषण अभियान'

या अभियानांतर्गत, पंतप्रधान मोदी महिला, किशोरवयीन मुली आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी मोहिमेचे उद्घाटन करतील. हे अभियान आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच महिला आणि बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चालवले जाईल. या मोहिमेअंतर्गत, आरोग्य शिबिरे आणि संस्थांद्वारे प्रतिबंधात्मक, प्रचारक आणि उपचारात्मक सेवा दिल्या जातील. या अभियानात महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी, ॲनिमिया प्रतिबंध, संतुलित आहार आणि मासिक पाळीतील स्वच्छता यांसारख्या विषयांवर विशेष भर दिला जाईल. महिला आणि किशोरवयीन मुलींना मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घेऊन कुटुंब आणि समाजाची सशक्त पाया बनण्यास मदत करणे, हा यामागचा उद्देश आहे.

पीएम मित्र पार्क - टेक्सटाईल हबच्या दिशेने मोठे पाऊल

पंतप्रधान मोदी देश आणि राज्यातील पहिल्या 'पीएम मित्र पार्क'ची पायाभरणी करतील. सुमारे २१५८ एकर परिसरात विकसित होणाऱ्या या पार्कमध्ये अत्याधुनिक सुविधा असतील. येथे २० एमएलडीचा 'कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट', १० एमवीएचा सौर ऊर्जा प्रकल्प, आधुनिक रस्ते, पाणी आणि विजेची पक्की व्यवस्था आणि ८१ 'प्लग-अँड-प्ले' युनिट्स विकसित केली जात आहेत. आतापर्यंत २३,१४६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यामुळे सुमारे ३ लाख रोजगार (१ लाख प्रत्यक्ष आणि २ लाख अप्रत्यक्ष) निर्माण होतील. हा पार्क शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला दुप्पट भाव मिळवून देण्यास मदत करेल.

या सुविधांचीही होणार सुरुवात

  • पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचे हस्तांतरण: पंतप्रधान एका क्लिकवर देशभरातील पात्र महिलांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करतील. मध्य प्रदेशातील सुमारे एक लाख महिलांना याचा लाभ मिळेल.

  • सुमन सखी चॅटबॉटचे अनावरण: पंतप्रधान मोदी ग्रामीण आणि दुर्गम भागातील गर्भवती महिलांसाठी चॅटबॉट सुरू करतील. यामुळे त्यांना वेळेवर योग्य माहिती आणि सेवा मिळू शकतील.

  • सिकल सेल स्क्रिनिंगच्या १ कोटीव्या कार्डचे वितरण: ही ऐतिहासिक कामगिरी देशात सिकल सेल ॲनिमियाविरुद्धच्या सामूहिक लढाईचे प्रतीक बनेल.

  • एक बगिया माँ के नाम: पर्यावरण सुधार आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी चालवल्या जाणाऱ्या या अभियानांतर्गत, पंतप्रधान महिला बचत गटांच्या सदस्यांना रोपे भेट देतील. राज्यात आतापर्यंत १०,१६२ महिला या योजनेशी जोडल्या गेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT