Amarnath Yatra | अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा कट उघडकीस Pudhari File Photo
राष्ट्रीय

Amarnath Yatra | अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा कट उघडकीस

शोपियाँमध्ये तिघांना अटक, किश्तवाडमध्ये दोघे ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

अनिल साक्षी

जम्मू : अमरनाथ यात्रेला लक्ष्य करून घातपात घडवण्याचा मोठा दहशतवादी कट उघडकीस आल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे. शोपियाँ जिल्ह्यात तीन ओव्हर ग्राऊंड वर्कर्सना अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून स्फोटके, हँड ग्रेनेड आणि दहशतवादी संघटनेशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. किश्तवाड जिल्ह्यातही दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

शोपियाँमधील पुडसू परिसरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे विशेष शोधमोहीम राबवली. या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीदरम्यान दोन हँड ग्रेनेड, सुमारे २.५ किलो प्लास्टिक स्फोटके, चार मोबाईल फोन तसेच प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित चार पोस्टर्स जप्त करण्यात आले.

३१ मेपासून होते बेपत्ता

सूत्रांच्या माहितीनुसार, हे तिघे ३१ मे २०२६ पासून आपल्या घरातून बेपत्ता होते. प्राथमिक चौकशीत ते दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या स्फोटकांचा वापर अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्यासाठी होणार असल्याचीही माहिती समोर येत असली, तरी अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, किश्तवाड जिल्ह्यातही दहशतवादी नेटवर्कला मदत करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये वन विभागातील एक सरकारी कर्मचारी तारिक अहमद गिनू आणि मोहम्मद इकबाल यांचा समावेश आहे. हे दोघे डच्चन परिसरातील टंडर गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोघे स्थानिक दहशतवाद्यांना साहाय्य आणि मदत करत होते. याच प्रकरणात यापूर्वी छात्रू परिसरातील आणखी दोनजणांना अटक केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT