लखनौ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करत पाकिस्तानातील कट्टरतावादी नेटवर्कशी संबंध असलेल्या उझैद नावाच्या तरुणाला अटक केली आहे. भारतीय लष्कराच्या चौकीवर ‘फिदायीन’ (आत्मघाती) हल्ला करण्याचा त्याचा कट होता. कोतवाली पोलिस आणि एसडब्ल्यूएटी पथकाने संयुक्त कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय आरोपी उझैद हा गेल्या १० महिन्यांपासून फरार होता. खबऱ्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहलोत रोड परिसरातून त्याला अटक करण्यात आली. फरार असताना तो कधी आपल्या मामाच्या घरी, तर कधी इतर ठिकाणी लपून राहायचा. सोशल मीडियावर तो भारतविरोधी मजकूर पाहत असे आणि हल्ल्याचे नियोजन करणाऱ्या विविध गटांचा सक्रिय सदस्य होता.
घरीच बॉम्ब जॅकेट बनवण्याचे नियोजन
यापूर्वी ८ नोव्हेंबर २०२५ रोजी यातील एका सोशल मीडिया गटावर भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. या योजनेनुसार, आत्मघाती हल्ल्यासाठी साजिदला 'बॉम्ब जॅकेट' दिले जाणार असल्याचे एका पाकिस्तानी सदस्याने सांगितले होते. यावर साजिदने आपण हल्ल्यासाठी १०० टक्के तयार असल्याचे उत्तर दिले होते. धक्कादायक म्हणजे, हे बॉम्ब जॅकेट घरीच तयार करण्याबाबतही त्यांच्यात चर्चा झाली होती.
पाकिस्तानी गँगस्टरचे पाठबळ आणि हल्ल्याचा कट
तपासात समोर आले आहे की, उझैद हा गेल्या वर्षी अटक करण्यात आलेल्या जम्मू येथील मोहम्मद साजिदच्या संपर्कात होता. हे दोघेही सोशल मीडियावर अनेक गट चालवून आक्रमक मजकुराद्वारे तरुणांची माथी भडकवण्याचे काम करत होते. या संपूर्ण नेटवर्कला पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याचे पाठबळ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.