गुमला; वृत्तसंस्था : झारखंड पोलिसांना नक्षलविरोधी अभियानात मोठे यश मिळाले आहे. प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) संघटनेची शाखा असलेल्या पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएलएफआय) प्रमुख मार्टिन केरकेट्टा मंगळवारी रात्री उशिरा गुमला येथील जंगलात झालेल्या चकमकीत ठार झाला. त्याच्यावर 15 लाख रुपयांचे बक्षीस होते आणि पोलिस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी प्रमुख दिनेश गोप याला नेपाळमधून अटक झाल्यानंतर केरकेट्टाने संघटनेची सूत्रे हाती घेतली होती. गोप आणि केरकेट्टा हे बालपणीचे मित्र होते आणि त्यांनी एकत्र शिक्षण घेतले होते. पुढे त्यांनी मिळूनच संघटनेचा विस्तार केला होता.
एका व्यावसायिकाकडून खंडणी घेण्यासाठी केरकेट्टा आपल्या साथीदारांसह परी-छंगाबारीच्या जंगलात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, उपविभागीय पोलिस अधिकारी नाझीर अख्तर यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहताच केरकेट्टाच्या पथकाने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात केरकेट्टा जागीच ठार झाला.
केरकेट्टाच्या मृत्यूमुळे ‘पीएलएफआय’ संघटनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. खंडणी, धमक्या देणे आणि सशस्त्र कारवायांची रणनीती ठरवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याचा मित्र दिनेश गोप याला राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली होती, ज्याच्यावर 25 लाखांचे बक्षीस होते. त्यानंतर केरकेट्टाने संघटनेचे नेतृत्व स्वीकारले होते.