नवी दिल्ली ः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ‘ईपीएफओ’ने पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया आता आणखी सुलभ केली आहे. त्यानुसार क्लेम सादर करतेवेळी फॉर्म नंबर 31 भरताना कॅन्सल चेकचा फोटो अपलोड करावा लागणार नाही. सोबतच, संबंधित कंपनी किंवा नियोक्त्याकडून आवश्यक मंजुरी घेण्याचीही गरज राहणार नाही.
यापूर्वी क्लेम सादर करताना खातेदाराचे नाव असणारा कॅन्सल चेकचा फोटो अपलोड करणे बंधनकारक होते. ‘ईपीएफओ’च्या ‘यूएएन’ पोर्टलवरून क्लेम सादर करताना आता चेकचा फोटो अपलोड करावा लागणार नाही किंवा बँक खात्याची माहितीदेखील द्यावी लागणार नाही. याशिवाय ज्या कंपनीत नोकरी करता तिथून व्हेरिफिकेशन म्हणजेच मंजुरी घेण्याची गरज लागणार नाही. यापूर्वी क्लेम सादर करताना बँक खात्याच्या कॅन्सल चेकचा फोटो किंवा पासबुकची पडताळणी केलेली कॉपी अपलोड करावी लागत असे. याशिवाय जिथे नोकरी करतो, तेथून बँक खात्याची पडताळणी करावी लागत होती.
‘ईपीएफओ’कडून दोन्ही प्रक्रिया समाप्त करण्यात आल्या आहेत. बँक खाते सुरुवातीपासून ‘यूएएन’ खात्याशी लिंक असते आणि त्याची पडताळणीही केलेली असते. यास्तव अतिरिक्त कागदपत्रांची गरज लागणार नाही. या बदलांमुळे क्लेम नाकारला जाण्याची शक्यता कमी होणार आहे. तसेच, खराब किंवा अस्पष्ट अपलोड केलेल्या फाईलमुळे निर्माण होणार्या तक्रारी घटणार आहेत. ‘केवायसी’ची पडताळणी केलेल्या काही सदस्यांसाठी ही सुविधा यापूर्वी लागू होती. 28 मे 2024 रोजी सुरू करण्यात आलेल्या या सुविधेचा फायदा आतापर्यंत 1.7 कोटी सदस्यांना झाला आहे. आता ती सर्व कर्मचार्यांसाठी लागू करण्यात आली आहे.
‘ईपीएफओ’चे 7.74 कोटी सक्रिय सदस्य आहेत. यामध्ये 4.83 कोटी सदस्यांनी आपली बँक खाती ‘यूएएन’ क्रमांकाशी लिंक केलेली आहेत. तसेच, 14.95 लाख सदस्यांची बँक खाती सध्या नियोक्त्याकडे प्रलंबित आहेत. आता नियोक्त्याच्या मंजुरीची गरज उरलेली नसल्यामुळे संबंधित सदस्यांना मोठा दिलासा मिळेल आणि क्लेमची प्रक्रिया वेगवान होईल.
एखाद्या सदस्याला ‘यूएएन’ क्रमांकासोबत जोडलेले बँक खाते बदलायचे असल्यास आणि नवा बँक खाते क्रमांक जोडायचा असल्यास ही प्रक्रियाही सुटसुटीत करण्यात आली आहे. नवा बँक खाते क्रमांक, आयएफसी क्रमांक आणि ओटीपी नोंदवून व्हेरिफाय करा. यामुळे पीएफ क्लेम मंजूर होण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे.