ICMR On Pesticide Exposure
नवी दिल्ली : कीटकनाशके पिकांचे रोग आणि कीटकांपासून संरक्षण करत असल्याने शेतकऱ्याला चांगले उत्पादन मिळते. यामुळेच याचा नियमित वापरही होतो;, पण अयोग्य वापरामुळे पर्यावरणाबरोबर मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो हे यापूर्वीच्या अनेक संशोधनात स्पष्ट झाले आहे. मात्र आता देशातील ग्रामीण लोकसंख्येच्या, विशेषतः शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर कीटकनाशकांचा गंभीर परिणाम होतोय, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे.
पश्चिम बंगालमधील कृषी क्षेत्रांमध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने कीटकनाशके फरवणी करणार्या शेतकर्यांवर नेमका कोणता परिणाम होतो याचा अभ्यास केला. पूर्व बर्दवान जिल्ह्यातील गलसी ब्लॉकमधील ८०८ शेतकरी कुटुंबांची तपासणी करणाऱ्या आयसीएमआर संशोधकांना असे आढळून आले की २२.३% कुटुंबांना सौम्य संज्ञानात्मक कमजोरी (एमसीआय), नैराश्य किंवा दोन्हीच्या संयोजनाची लक्षणे जाणवली. यापैकी अनेक शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांत शेती करताना कीटकनाशकांच्या नियमित संपर्कात आल्याचे नोंदवले.
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (आयजेएमआर) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ज्यांनी आठवड्यातून किमान एकदा कीटकनाशके फवारली त्यांना मानसिक आरोग्य समस्यांचा धोका २.५ पट वाढला. संशोधकांच्या मते, या पॅटर्नवरून स्पष्टपणे दिसून येते की, कीटकनाशकांचा संपर्क येणार्यांना न्यूरोसायकिएट्रिक विकारांच्या म्हणजे मेंदू आणि मन या दोन्हीला प्रभावित करणारे डिप्रेशन (नैराश्य), स्कीझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता),ऑटिझम (स्वमग्नता),अल्झायमर, एकाग्रतेचा अभाव आणि अतिचंचलता विकार होण्याचा धोका आहेत.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या डॉक्टरांनी शेतकऱ्यांच्या रक्ताचे नमुने तपासले.या तपासणीत, रक्तातील तीन महत्त्वाच्या गोष्टी (ज्यांना 'बायोमार्कर' म्हणतात) शोधल्या. यामध्ये असे आढळले की, जे शेतकरी दिवसातून ८ तासांपेक्षा जास्त वेळ शेतीमध्ये काम करतात. तसेच आठवड्यातून किमान एकदा कीटकनाशके वापरतात, त्यांच्यात पॅरॉक्सोनेस १ (PON1) पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आढळली. 'पीओएन१' हे एक प्रकारचे एन्झाइम (शरीरातील काम करणारे रसायन) आहे.जेव्हा एखादा माणूस 'विषारी कीटकनाशकाच्या संपर्कात बराच काळ राहतो, तेव्हा हे 'पीओएन१' एन्झाइम वाढू लागते.हे एन्झाइम वाढणे म्हणजे शरीराने दिलेला एक 'धोक्याचा इशारा' आहे. यातून हे स्पष्ट होते की, शरीर या रासायनिक विषावर तीव्र प्रतिक्रिया देत आहे आणि ते शरीराला हानी पोहोचवत आहे.
संशोधकांनी असे नोंदवले की ३० वर्षांहून अधिक काळ शेती करणाऱ्या आणि दीर्घकाळ कीटकनाशकांच्या संपर्कात असलेल्या शेतकऱ्यांना १.८ पट धोका वाढतो. हा धोका महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जवळजवळ दुप्पट होता. अभ्यासात असेही दिसून आले आहे की शेतमजूर जे संपूर्ण दिवस शेतात घालवतात त्यांना केवळ स्मरणशक्ती कमी होतेच असे नाही तर दैनंदिन कामे करण्यातही अडचणी येतात. अनेक प्रकरणांमध्ये, हालचालींच्या विकारांची सुरुवातीची लक्षणे देखील आढळून आली.
आयसीएमआरने केंद्र आणि राज्य सरकारांना शिफारस केली आहे की, ग्रामीण भागात कीटकनाशकांशी संबंधित मानसिक आरोग्य समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय जागरूकता, प्रशिक्षण आणि आरोग्य देखरेख कार्यक्रम सुरू करावा.
पश्चिम बंगालमधील आयसीएमआरच्या सेंटर फॉर एजिंग अँड मेंटल हेल्थचे प्रोफेसर अमित चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे की, शेतकर्यांनी कीटकनाशक फवारणी करताना सुरक्षा किट, मास्क, हातमोजे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या प्रोटोकॉलबद्दल शेतकऱ्यांना शिक्षित करणे आवश्यक आहे.