पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असणार्या औरंगजेब वाद आणि नागपूरमधील हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, "बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात धर्मावर आधारित आरक्षण स्वीकारले गेले नाही. अयोध्येत राम मंदिर हे संघाचे यश नाही तर समाजाचे यश आहे. आक्रमक किंवा आक्रमक मानसिकतेचे लोक भारतासाठी धोका आहेत." ते आज (दि.२३) बंगळूरुमध्ये झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी होसाबळे म्हणाले की, दिल्लीत एक 'औरंगजेब रोड' होता, ज्याचे नाव अब्दुल कलाम रोड असे ठेवण्यात आले. यामागे काही कारणे होती. औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह याला नायक बनवण्यात आले नाही. गंगा-जमुना संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी दारा शिकोह यांना पुढे आणण्याचा विचार कधीच केला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आपण अशा व्यक्तीचे प्रतीक बनवू जो भारताच्या संस्कृतीच्या विरोधात होता. या भूमीच्या परंपरेनुसार काम करणाऱ्यांसोबत जाऊ? स्वातंत्र्याची लढाई ब्रिटिशांविरुद्ध लढली जात असेल तर ती स्वातंत्र्याची लढाई आहे. त्यांच्या आधी आलेल्यांविरुद्ध, म्हणजेच इंग्रजांपूर्वीचा लढा हा देखील स्वातंत्र्याचा लढा होता. महाराणा प्रताप यांनी जे केले ते स्वातंत्र्यासाठीचा लढा होता. जर आक्रमक मानसिकतेचे लोक असतील तर ते देशासाठी धोका आहेत. आपल्या देशाच्या संस्कृतीशी आपण कोणाला जोडणार आहोत हे आपण ठरवायचे आहे, असे स्पष्ट करत हा धर्माचा विषय नाही. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ठाम दृष्टिकोन आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.